राजू बेग यांना लागले पक्ष बदलाचे वेध; समीर वंजारी
सावंतवाडी नगर परिषदेतील सत्ताधारी भाजपाप्रणीत पक्षाचे गटनेते राजू बेग हे ज्या प्रभागाचे नेतृत्व करतात तो प्रभाग काँग्रेस धार्जिणा आहे, वर्षभरानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू बेग यांनी पुन्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी आतापासूनच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केलीय, अशी टीका सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केली. सावंतवाडी कर जनता सुज्ञ आहे याची जाणीवही करून त्यांनी दिली आहे.
नळाला पाणी नाही, या मुद्यावर सत्ताधारी गटाच्या राजू बेग यांनी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयात घागर आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी प्रशासनावर जहरी टीका केली. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी राजू बेग यांच्या स्टंटबाजी चा कडव्या शब्दात समाचार घेतला.
अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं, सत्तेत राहिले, आता नगराध्यक्ष अकार्यक्षम आणि स्वतःही अकार्यक्षम असल्याचे राजू बेग यांनी सावंतवाडी करांना दाखवून दिले आहे.
आज जिथे आहेत, त्या पक्षातून आपण निवडून येऊ शकत नाही याची जाणीव झाल्याने राजू बेग यांना आता पक्ष बदलाचे वेध लागले आहेत,याकडेही समीर वंजारी यांनी लक्ष वेधले आहे.