मालवण :
वराड सोनवडे गावांना जोडणाऱ्या कर्ली नदी पात्रावर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या प्रश्नी वराड ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी रविवारी मुसळधार पावसात वराड गावात भेट देऊन पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
उपस्थित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टीने कार्यवाही करावी. संबंधित एजन्सीकडून काम लवकर पूर्ण करून घ्या. सोबत पुलाला जोडणारा रस्ता कामही पूर्ण झाले पाहिजे. दोन महिन्यात जास्तीत जास्त काम पूर्ण करून पूल पूर्णत्वास आला पाहिजे. दोन महिन्यांनी पुलाची पाहणी करण्यासाठी पुन्हा येईन तेव्हा ग्रामस्थ पुलाच्या कामाबाबत समाधानी असले पाहिजेत. अशी भूमिका निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चे दरम्यान मांडली.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती अजिंक्य पाताडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, बबन पांचाळ यासह वराड ग्रामस्थ उपस्थित होते.