वैभववाडी प्रतिनिधी
अतिवृष्टीत वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील एडगांव फौजदारवाडी, ईनामदारवाडी नजीकचा पूल वारंवार पाण्याखाली जात आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व आजारी रुग्ण यांना अनेकदा मार्गात ताटकळत थांबावे लागत आहे. या ठिकाणी नव्याने उंचीचा पूल बांधण्यात यावा. व हा मार्ग निर्धोक व्हावा. यासंबंधी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले. सदर पूलाचे काम स्वतः पाठपुरावा करून लवकरच मार्गी लावले जाईल असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी तालुकावासिंयांना दिले आहे.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील एडगांव फौजदारवाडी, ईनामदारवाडी नजीकचा पूल चार तास पाण्याखाली गेला होता. अतिवृष्टीत वारंवार हा पूल पाण्याखाली जात असल्याने तालुक्यातील जवळपास वीस गावांचा संपर्क तुटतो. वैभववाडीत येण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. अतिवृष्टीत मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे, गरोदर महिलांचे मोठे हाल होतात. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व कामासाठी येणार्या नागरिकांचे यामुळे हाल होतात. माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी शुक्रवारी या प्रमुख समस्ये बाबत आ. नितेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार नितेश राणे यांनी सदरचे काम मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे.