प्रेरणा महिला ग्रामसंघाची मागणी; वेंगुर्ले पोलिसांना निवेदन सादर…
वेंगुर्ला
मठ येथील सायली यशवंत गावडे हिचा खून करणाऱ्या संशयित गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी प्रेरणा महिला ग्रामसंघातर्फे वेंगुर्ले पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली.मठ येथील कु. सायली गावडे हिचा २८ ऑगस्टला गोविंद माधव याने निर्घुण खून केला. ही घटना निंदनीय असून याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. अशा प्रकारच्या घडलेल्या घटनेमुळे समाजातील मुले व महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गुन्हेगारांना मोकाट न सोडता त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी. तसेच त्यांना जामिनीही मंजूर करता नये. सायलीच्या मृत्यूने तिचे आई, वडील, काका, काकी, भाऊ, आजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांचे पैशाच्या स्वरुपात कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
त्यामुळे सायली गावडे हिचा खून करणा-या तिच्या मैत्रिणीचा पती गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याला जास्तीत जास्त कठोर (आजन्म कारावास किवा मृत्यूदंड) शिक्षा देण्याच्या दृष्टीने सखोल तपास करुन जास्तीत जास्त पुरावे जमा करावेत. तसेच शिक्षा देण्यासाठी याचा प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्यात यावा. त्याला झालेली शिक्षा ही तिला मिळालेली श्रद्धांजली समजली जाईल. तरी सायली गावडे हिच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादरकरतेवेळी प्रेरणा महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.