You are currently viewing आंबा व काजू पीक संरक्षण मोहिमेसाठी सिंधुदुर्गची निवड

आंबा व काजू पीक संरक्षण मोहिमेसाठी सिंधुदुर्गची निवड

१ ऑक्टोबर पासून प्रारंभ३० जुलै २०२३ पर्यंत कालावधी

वेंगुर्ला

आंबा व काजू फळ पिकांकरीता क्रॉपसॅन योजनेंजर्गत कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) ‘आंबा व काजू पिक‘ सन २०२२-२३ हा प्रकल्प कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांमध्ये १ ऑक्टोबरपासून राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पाचा कालावधी हा ३० जुलै २०२३ पर्यंत राहणार आहे.

फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) आंंबा व काजू पिक अंतर्गत आंबा व काजू फळपिकांकरीता सिधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच निश्चित प्लॉटधारक शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली अंतर्गत येणा-या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत प्रशिक्षण घेण्यात आले. त्या माध्यमातून आंबा व कजू फळपिकांवरील कीड-रोगांची ओळख, नियंत्रणाच्या उपाययोजना, निरिक्षणे घेण्याच्या पद्धती तसेच हवामानातील बदल व अवेळी पावसामुळे उद्रेक करणा-या कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, भारतीय कृषि संशोधन परिषद नवी दिल्ली, कृषि विद्यापिठे, विविध संशोधन केंद्र व कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून योजनेचे काम केले जात आहे. यासाठी किमान ५०० आणि जास्तीत जास्त २००० हेक्टर क्षेत्रासाठी एक सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक गावातील निश्चित प्लॉट व रॅन्डम प्लॉटमधून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी सर्वेक्षण करुन पिकांची अवस्था व कीड-रोगांची निरिक्षणे करुन अहवाल नोंदवतात. कीड-रोग नियंत्रक कृषि अधिकारी या योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करतात. जर कीड-रोग आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषि विद्यापिठामार्फत त्यावर मार्गदर्शक सूचना पाठविण्यात येतात. त्यानुसार कीड-रोगांचे नियंत्रणाचे उपाय केले जातात.

कोकणा विभागातील शेतक-यांना तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्रावर शेतीशाळा आयोजित केल्या जातात. कोकण विभागातील आंबा फळपिकासाठी ३६ व काजूकरीता २१ शेतीशाळा असून त्यासाठी क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचा एक भाग म्हणून सिधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यांसाठी त्यांचा उपविभागस्तरावर दोन तालुक्यामध्ये एक याप्रमाणे एकूण चार प्रशिक्षणे आंबा व काजू पिकाकरीता आयोजित केली होती. या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील कीडी-रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.अजय मुंज यांनी आंबा पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख व नियंत्रण याविषयी व डॉ.गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील इतर दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा