दोडामार्ग
तिलारी-दोडामार्ग राज्यमार्गावर आंबेली येथे एकाच दिवशी दोन अपघात झाले. एका वळणावर दोन मोटार कार एकमेकांना समोरासमोर धडकले तर भाजी टेंपोला दुसऱ्या वाहनाने हुल दिल्याने टेंपो रस्त्या बाहेर गेला असता दुसरा अपघात घडला. दोन्हीं ठिकाणचे अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, वाहानांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पहिला अपघात आंबेली केळीचे टेंब येथील वळणावर दोन मोटार कार मध्ये झाला. एमएच. ०३. बीएस. ७५०४ ही पर्यटकांची इर्टीगा मोटार कार तिलारी मार्गे गोव्याच्या दिशेने जात होती. आंबेली टेंबवाडी येथे आली असता दुचाकीला बगल देऊन सुसाट वेगात जात होती. तर समोरून दुचाकी व तिच्या पाठीमागे एमएच ०७. एजी ५८८४ ही ब्रिझा मोटार कार दोन्हीं भेडशीच्या दिशेने येत होते. समोरून येत असलेली गाडी आपली धावपट्टी सोडून विरुद्ध धावपट्टीवरून सुसाट वेगात येत असल्याचे पाहून दुचाकी धारकाने आपली दुचाकी रस्त्याच्या बाहेर घातली. मात्र, पाठीमागून आलेल्या ब्रिझा मोटार कार व पर्यटकांची इर्टीगा मोटार कारला सोमोरा समोर धडक बसली. ब्रिझा चालकानेही थेट रस्त्याच्या बाहेर गाडी नेऊन अपघात वाचविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु समोरून आपली धावपट्टी सोडून आलेल्या इर्टीगा मोटार मुळे धडक बसून अपघात घडला. हे पर्यटक मुंबई वरून गोवा फिरण्यासाठी आले होते. या अपघातानंतर राज्य मार्गावर वाहानांची कोंडी झाली. दरम्यान शिवसेनेचे बाबुराव धुरी घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलीस ठाण्यात काळविताच पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व हवालदार अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले. अपघाती दोन्हीं मोटार बाजूला करून राज्यमार्ग खुला केला. या अपघातात कोणाही दुखापत झाली नाही परंतु दोन्हीं गाड्यांचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.
याच दरम्यान आंबेली कोनाळकर वाडी येथे दुसरा अपघात घडला. भाजी टेंपोला एका टिपरने हुल दिली यात टेंपो थेट झाडीत गेला. सामोरा समोर धडक बसणार या भीतीने आपण टेंपो थेट पूर्णतः रस्त्या बाहेर नेल्याचे चालकाने सांगितले. तदनंतर दुसरे वाहन आणून भाजीचा टेंपो झाडीतून बाहेर काढण्यात आला.