सावंतवाडी :
डेगवे गावात बांदा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील नारायण शिवराम गावडे यांच्या कोकम, फणस प्रक्रिया युनिटचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर युनिट साठी बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून अर्थसहाय्य करण्यात आले असून कृषी विभागाकडून सदर प्रकल्प सादर करण्यात आला होता.
उद्घाटन प्रसंगी कोकणामध्ये फळप्रक्रीया उद्योगाला बराच वाव असून शेतकऱ्यांनी शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे तरच शेतकऱ्यांना शेतमालाचे मूल्यवर्धन करून अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो असे अजित अडसुळे यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, बँकेचे रणपिसे, बांदा मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, मंडळ कृषी अधिकारी, सावंतवाडी दोनचे यशवंत गव्हाणे, कृषी पर्यवेक्षक सरगुरू तसेच प्रकल्पासाठी कृषि विभाग अंतर्गत सहकार्य करणारे डी. आर. पी. प्रताप चव्हाण आणि बांदा मंडळातील कृषी सहाय्यक डेगवे अतूल माळी, विलवडे रसिका वसकर, भालावल पूनम देसाई, शेर्ला श्वेता बेळगुंदकर, कृषी मित्र डेगवे सूर्याजी देसाई, सुरेश भाईप यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सदर युनिटचा उपयोग फणस वेफर्स, आंबा पोळी, केळी वेफर्स व कोकम प्रक्रीयेसाठी होणार असून त्यातून रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातून आतापर्यंत स्वप्निल देसाई डेगवे, पुर्णरेखा म्हावळणकर बांदा, समिधा सावंत तांबुळी आणि नारायण गावडे डेगवे अशा ४ युनिटच्या प्रस्तावांना बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले असून बांदा मंडळ यामध्ये आघाडीवर आहे.
यामध्ये कृषी विभाग अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन, प्रचार, प्रसार केल्यामुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असून अजूनही शेतकरी सहभागी होतील आणि व्यवसाय समृद्धपणे करतील यात शंका नाही. डेगवे गावचे कृषी सहायक अतुल माळी यांनी जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे .