You are currently viewing आंबोली घाटात कठड्याला आढळल्याने युवक कोसळला खोल दरीत

आंबोली घाटात कठड्याला आढळल्याने युवक कोसळला खोल दरीत

रेस्क्यू टीमच्या सहाय्याने आंबोली पोलिसांनी दिले जीवदान

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातून कामावरून घरी परतत असताना आंबोली घाटात रस्त्याच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने युवक सुमारे ८० ते ८५ फूट खोल दरीत पडला. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. गणपत राजाराम राऊत ( ४२, रा. आंबोली ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळताच आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोलीस स्टाफ व आंबोली रेस्क्यु टीमच्या सहकार्याने रसीच्या साहाय्याने सदर युवकाला बाहेर काढले.

गणपत राऊत हे सावंतवाडी शहरातील एका आस्थापनेमध्ये नोकरीला आहेत. सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना आंबोली घाटात रस्त्याच्या कठड्याला टक्कर होऊन ते सुमारे ८० ते ८५ फूट खोल दरीमध्ये पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागून रक्त वाहत होते. यावेळी तेथून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी आंबोली पोलिसांना याबाबतची खबर दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस नाईक दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोली रेस्क्यू टीम च्या सहाय्याने त्याला दरीतून बाहेर काढले. या रेस्क्यू टीममध्ये
मायकल डिसोजा , अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राजू राऊळ, दीपक मेस्त्री, रत्नजित केळुसकर यांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला असता आपली कोणाविरुद्ध तक्रार नसून स्वतः पाऊस आणि धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने ते दरीत पडल्याचे सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा