कर्नाटक मध्येही दाखल होत्या तक्रारी..
मुंबईतून कनेडी या मूळ गावी येऊन कुडाळ, कणकवलीत अनेकांना गोल्ड ट्रेडिंगच्या नावाने “अक्षय” योजना राबवून एका युवकाने बक्कळ व्याज देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घातला. लोकांकडून कायदेशीर कागदपत्रे करून घेत सुरू केलेला गोल्ड ट्रेडिंगचा धंदा सुरू केला, सुरुवातीस चांगले व्याज देत विश्वास संपादन केला. विश्वास बसल्यावर या “अक्षय” योजनेचे व्यवहार विना कागदपत्रे करायला सुरुवात केली आणि विना कागदपत्रे करणार्यांना परतावा अधिक देण्याचे जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना फसवायला वेळ लागत नाही याची प्रचिती इथेही आली आणि जास्त व्याजदाराच्या आशेने अनेकांनी गोल्ड ट्रेडिंगच्या व्यवसायात पैसे गुंतविले.
लोकांकडून घेतलेल्या पैशातून तो दुबईतून सोने आणून विकायचा व रोजच्या बाजारभावाने व्याजही देत होता. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून लोकांचे पैसे देणे बंद केले आणि दि.८ ऑक्टोबर पासून मोबाईल बंद करून अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावून हा “अक्षय” गोल्ड ट्रेडिंग करणारा गायब झाला आहे.
“अक्षय” गोल्ड ट्रेडिंग करणारा युवक गायब झाला तेव्हा त्याचा ड्राइवर त्याला मुंबईत दादरला रस्त्यावर सोडून आला. तो मुंबईत जायचा तेव्हा कधीच विशिष्ठ जागी उतरत नसायचा. वाटेत गाडी चालू ठेऊन ५/६ तास थांबायचा. मध्येच एखादा माणूस येऊन त्याला काहीतरी द्यायचा आणि बोलणी करून लगेच कणकवलीला यायला निघायचा. मुंबईत कधीच थांबत नसायचा. यावेळी ड्राइवर त्याला मुंबईत सोडून आला तेव्हा लोकांनी ड्राइवर कडून गाडीची चावी घेत गाडी तपासली असता डिकीमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रारी केलेल्या कागदपत्रांच्या प्रति भेटल्या ज्यात कर्नाटकातील बेंगलोर येथे तक्रार केलेल्या १०/१२ कागदपत्रे होती.
“अक्षय” योजनावाल्याचा वकील कोणीतरी मोठा आहे, कुठेही तक्रार झाली तर त्याचा वकील सर्व मिटवतो, त्याठिकाणी हा जात सुद्धा नाही. कर्नाटक येथे तक्रार झालेल्या सर्व केसीस सुद्धा या वकिलाने मिटविलेल्या आहेत आणि त्या तक्रारी फाईल बंद झालेल्या आहेत.
हा “अक्षय” गोल्ड ट्रेडर राहत असलेला फ्लॅट भाड्याचा होता. जाताना तो फ्लॅट खाली करून गेला आहे. काही लोकांना त्याने आचऱ्यातील एक बंगला स्वतःचा म्हणून दाखवला होता. परंतु तो स्वतः कणकवली तालुक्यातील कनेडी येथील रहिवासी असून आचरा येथे बंगला असल्याचे खोटे सांगितले होते. त्याच्या स्वतःच्या घरातून त्याच्या अशा करतुदींमुळे त्याला हाकलून दिलेला आहे.
काही वर्षांपूर्वी एटीएम अफरातफरीत सुद्धा हा सापडला होता. तसेच या “अक्षय” गोल्ड ट्रेडर ने एका व्यक्तीला १३ लाखांची एनईएफटी (NEFT) केलेली होती. समोरच्या व्यक्तीला पैसे आल्याचे मेसेज सुद्धा गेले होते, परंतु तात्काळ याने आपण केलेली एनइएफटी बँकेकडून परत मागवून घेतली. त्यामुळे या “अक्षय” गोल्ड ट्रेडर्स चे बँकेतील अधिकाऱ्यांशी सुद्धा साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.
कणकवली, कुडाळ मधील अनेकांना पैशाच्या आशेने गंडा घालणाऱ्या या “अक्षय” गोल्ड ट्रेडिंग करणाऱ्याचे प्रताप उघड झाले असून अनेकजण फसले गेल्याने चिंतेत आहेत. पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांना गंडा घालणाऱ्या या अक्षय योजना राबविणाऱ्याचा शोध घेऊन जिल्ह्यातील फसले गेलेल्या लोकांना दिलासा देणे गरजेचे असून लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा भामट्यांविरुद्ध तक्रार दिली पाहिजे. म्हणजे अशा फसव्या योजनांमध्ये आणखी कोणी फसू नयेत.