- जिल्हा क्रीडा समन्वय समितीची मागणी; क्रीडा अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…
- सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात चांगले आणि उत्कृष्ट असे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्ह्यात ५ राज्यस्तरीय व २० विभागस्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी सर्व क्रीड़ा संघटना, क्रीड़ाप्रेमी, खेळाडू, यांची संयुक्त सभा घेऊन राज्याच्या क्रीड़ा धोरणानुसार नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीने जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विविध खेळांच्या ४० पेक्षा अधिक एकविध खेळसंघटना कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध खेळांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य गेली अनेक वर्ष चालू आहे. दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून एक हजार पेक्षा अधिक खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात व त्यातील काही निवडक गुणवत्ता धारक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतात.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे यांच्या ११ ऑक्टोंबर २०२२ च्या परिपत्रकानुसार राज्यस्तरीय शालेय स्पर्धा २०२२-२३ स्पर्धा आयोजन स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण ४७ खेळांचा समावेश असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याचे दिसून येत नाही. ही बाब अतिशय गंभीर व जिल्ह्यासाठी खेद जनक आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. मागील कित्येक वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये विविध ३० पेक्षा अधिक खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन व नियोजन यशस्वीरीत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटनाने एकजुटीने पूर्ण केलेले आहेत. मागील कोरोना काळात कोणत्याही स्पर्धेचे नियोजन झालेले नव्हते. ही बाब लक्षात घेता सन २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यात ५ राज्यस्तरीय स्पर्धा व २० विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीने आज जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शीरस यांची भेट घेत केली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, क्रिडामार्गदर्शक, क्रिडा, प्रशिक्षक क्रिडा शिक्षक, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय – राज्यस्तरीय खेळाडू, क्रिडाप्रेमी, क्रिडा पत्रकार यांची संयुक्त सभा लवकरात लवकर आयोजित करून महाराष्ट्राचे राज्य क्रिडा धोरनानुसार नियोजनबद्ध आराखडा तयार करावा अशीही मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जयराम वांयगणकर, नंदन वेंगुर्लेकर, बयाजी बुराज, व्ही एल मयेकर अजय शिंदे, एच आर सावंत, आदी उपस्थित होते.