देवगड :
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ७ सप्टेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. भारतीय राजकारणात एक इतिहास या भारत जोडो यात्रेचा होणार आहे. राजकीय पक्षाची सर्वात मोठी पदयात्रा म्हणून याकडे पाहिले जात आहे. तब्बल १५० दिवस भारताला दोन टोकापर्यंत जोडणारे कन्याकुमारी ते कश्मीर असा ३५०० किलोमीटरचा प्रवास हा १२ राज्यातून ही यात्रा चालून करणार आहेत.
२०१४ पासून देशात मोदी सरकार आल्यापासून देशात राजकारणाची दिशा ही वेगळ्याच स्वरूपात पाहायला मिळत आहे. एका धर्माचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावर लोकशाहीला घातक असे अनेक प्रयत्न विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी केले जात आहेत.
देशात दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी, प्रचंड उफाळून आलेली महागाई, महिला अत्याचार, तुटपुंजी परदेशी गुंतवणूक, अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण जातीयभेदभाव आणि नुकताच येऊन गेलेला कोविड सारखा जागतिक महामारीचा आजार यामुळे देशातील वातावरण नकारात्मक दिशेला जात असताना सामान्य माणसाच्या हाकेला साथ देत राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकसंघ होण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते अनेकांना साद घालत आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत, पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या समवेत सामाजिक चळवळी त्यातील कार्यकर्ते, लेखक आणि कलाकार हे देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. आणि छोट्या मोठ्या पक्षांचे या रॅलीला समर्थन आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, विविध वयोगटातील नागरिक अतिशय आनंदाने हजारोंच्या संख्येने सहभागी होताना या रॅलीमध्ये दिसत आहेत. राहुल गांधी हे दिव्यांग, छोटे दुकानदार, मजूर, मच्छीमार, ऑटो चालक, अंगणवाडी सेवेकरी अशा विविध घटकांची निगडित असलेल्या लोकांसोबत संवाद साधत आहेत. येणाऱ्या यात्रेची तासंतास वाट पाहत उभा असलेला जनसमुदाय पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड पासून सुरू होणाऱ्या भारत जोडो पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर यांनी सांगितले आहे. या भारत जोडो पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.