कॅरम हाऊस कुडाळची सांघिक स्पर्धेत बाजी..
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची ४थी वरिष्ठ अजिंक्यपद आणि आंतरक्लब कॅरम स्पर्धा दिनांक ७/८/९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकेरी गटामधे ५६ स्पर्धक, सांघिक गटांमधे ६ संघ तर वयस्कर गटामधे ८ जण सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेसाठी इंडियन ऑइल कार्पोरेशन मुख्य पुरस्कर्ता होते.
स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमान लखमराजे भोसले यांच्या शुभ हस्ते झाले. सुरवातीला असोसिएशनच्या संस्थापक कार्यकारिणीचे सरचिटणीस कै. सूर्यकांत पेडणेकर आणि खेळाडू प्रतिक व अर्पित बांदेकर यांचे वडील कै. गुंडू बांदेकर यांच्या निधनाबद्दल सर्वानी उभे राहून श्रद्धांजली वाहिली. ही अजिंक्यपद स्पर्धा कै. सूर्यकांत पेडणेकर यांना समर्पित केली. चिटणीस योगेश फणसळकर यानी प्रास्ताविकामधे जिल्हा असोसिएशनच्या प्रगतीचा आढावा घेतला. ह्या अजिंक्यपद स्पर्धेचे सर्व चषक असोसिएशनचा गुणी खेळाडू कै. अर्जुन माळी स्मृतीचषक म्हणून देण्याची घोषणा कार्यकारिणी सदस्य श्री. दिलीप वाडकर यांनी केली. अध्यक्ष अँड. अवधूत भणगे यांनी काॅलेजचा बॅडमिंटन हाॅल स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथम कार्यकारिणीचे आभार मानले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. श्रीमान लखमराजेंनी आपल्या मनोगतामधे जिल्हा कॅरम संघटनेच्या उपक्रमांबद्दल कौतुक केले. आणि पुढील वाटचालीमधे आपण सदैव असोसिएशन सोबत असल्याची ग्वाही दिली.
दि. ७ रोजी झालेल्या सांघिक स्पर्धेत पहिल्या ४ फेऱ्यांमधे कॅरम हाऊस कुडाळने निर्णायक आघाडी घेतली. शनिवारी अंतिम ५ व्या फेरीत विजय मिळवत १० गुणांसह विजयावर शिक्कामोर्तब केला. कॅरम हाऊस कुडाळ कडून एकमेव पराभव स्विकरलेल्या कणकवली कॅरम क्लबला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सावंतवाडी कॅरम क्लबने ६ गुणांसह तिसरे स्थान निश्चित केले.
शनिवारी एकेरीच्या ३ फेऱ्या खेळविण्यात आल्या. रविवारी एकेरीच्या उपउपान्त्य फेरीचे खडतर आव्हान पार करून उपान्त्य फेरीच्या एका सामन्यात सावंतवाडीच्या अर्पित बांदेकर त्याचाच मोठा भाऊ प्रतिक बांदेकर वर १०-२५,२२-१९,२५-१४ तर दुसऱ्या सामन्यात कुडाळच्या सागर ढवळने कणकवलीच्या गौतम यादव वर २५-००,२३-१२ असा सहज विजय मिळवला. जेतेपदाच्या इर्षेने अंतिम सामना खेळणाऱ्या अर्पित विरूद्ध सागरने पहिल्या गेम मधे २५-१२ असा थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या गेम मधे सातव्या बोर्ड मधे २५-०८ असे सागरला नमवून अर्पितने प्रतिष्ठेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे एकेरीचे जेतेपद पटकावले. २० दिवसांपूर्वी निधन झालेल्या आपल्या वडिलांना हे पहिले अजिंक्यपद समर्पित केल्याचे अर्पितने सांगितले.
वयस्कर गटामधे अंतिम सामन्यात सावंतवाडीच्या वसंत जाधव यांनी कुडाळच्या श्रीमंत चव्हाण यांचा पराभव केला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्र व अखिल भारतीय कॅरम महासंघाचे मानद उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे प्रमुख आधारसतंभ मा. शांताराम गोसावी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सुनील धुरी व अन्य सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना गोसावी साहेबांनी जानेवारी महिन्यात कुडाळ येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धा घेण्याचा मानस जाहीर केला. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये कॅरमचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली.
विजेत्यांना रोख रकमेची बक्षीसे आणि चषक देऊन गौरवण्यात आले.