You are currently viewing शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे- प्रा.एस.एन.पाटील

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे- प्रा.एस.एन.पाटील

वैभववाडी

व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य या संकल्पनेत शारीरिक, बौद्धिक, मानसिक व सामाजिक घटकांचा समावेश होतो. उत्तम आरोग्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे असे मत प्रा. श्री.एस.एन.पाटील यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र व सामाजिक शास्त्रे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० ऑक्टोबर हा “जागतिक मानसिक आरोग्य दिन” प्रा.डॉ.एन.व्ही.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.श्री.एस.एन. पाटील, मानसशास्त्र व सामाजिक शास्त्रे विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.गुलदे, प्रा.आर.बी‌.पाटील व प्रा.व्ही.व्ही.शिंदे उपस्थित होते.

शरिराप्रमाणे मनही आजारी पडू शकते याबाबत बरेच अज्ञान आहे. याबाबत समाजात जनजागृती होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला एक चांगला मित्र असला पाहिजे.
अबोलपणा, एकाकीपणा, भिती व नकारात्मक विचारातून न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होतो. परंतु चांगल्या सवयी,व्यायाम, वाचन सकारात्मक विचारातून जीवनात यश प्राप्त करता येते असे प्रा.पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हस्यासन हा योग प्रकार घेऊन हसण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
मानवी जीवनामध्ये हसणे, रडणे, व्यक्त होणे या स्वाभाविक गोष्टी आहेत. सुदृढ आरोग्यासाठी निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचा वास असला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.एन.व्ही.गवळी यांनी सांगितले.
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात वाटचाल करीत असताना मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. शारीरिक आजार डॉक्टरांच्या सल्ल्याने बरा होतो तसाच मानसिक आजारही मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बरा होतो. प्रत्येक व्यक्ती कमी जास्त प्रमाणात मानसिक दृष्ट्या आजारी असतात. मानसिक आजाराबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रा.डॉ.आर.एम.गुलदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.आर.एम. गुलदे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =