सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये काल रविवारी दिवाळीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कंदील, तोरण, रंगीत पणत्या विविध प्रकारच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, दिवाळीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे जसे की, साबण, उटणे, चकल्यांसाठी लागणारे पीठ यादेखील वस्तूंची विक्री करण्यात आली.
या वस्तू विक्रीपासून विद्यार्थ्यांना एकूण ८७,९७० रुपये नफा प्राप्त झाला. त्याचप्रमाणे या दिवशी आणखी एक उपक्रम राबवला गेला. त्या उपक्रमामध्ये अनेक टाकाऊ वस्तु म्हणजेच जुने लोखंड, रद्दी, जुनी खेळणी या वस्तू विद्यार्थिनी जमा केल्या व त्यापासूनही विद्यार्थ्यांना नफा प्राप्त झाला. त्या वस्तूंपासून मिळणारी रक्कम, तसेच प्रदर्शनामध्ये भरवलेल्या वस्तूंच्या विक्रीपासून मिळणारी रक्कम ही विद्यार्थ्यांच्या एस्.एस्.जी. बँक खात्यामध्ये गोळा करण्यात येत आहे. अशाप्रकारे या टाकाऊ वस्तूपासूनही विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचा विचार या कार्यक्रमांमध्ये केला गेला.
या दिवशी विद्यार्थ्यांनी केलेल्या टाकाऊ वस्तु व त्यापासून मिळणारा नफा, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या मार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या मधील सुप्त गुणांना मिळणारा वाव यांना महत्त्व देण्यात आले. या उपक्रमांमध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.