कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ येथील खुशबू स्वयंसहायता बचत गटाने दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या यश कथा संकलित व्हाव्यात, यासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय सुयश प्राप्त केल्याबद्दल एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण, संदीप मेस्त्री, बँक संचालिका अलका ढवन यांनी या बचत गटाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या बचत गटाच्या व्हिडिओला तीन लाखांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात संकलित व्हाव्यात, यासाठी राज्यस्तरावर लघुपट, माहितीपट, चित्रफीत निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हातील खुशबू स्वयंसहायता बचत गट कलमठ कणकवली, श्री समर्थ कृपा स्वयंसहाय्यता समूह खारेपाटण, जागृती ग्राम संघ बिडवाडी-कणकवली या तीन बचत गटाच्या यशोगाथेच्या दृकश्राव्य चित्रफिती शासन स्तरावर स्पर्धेसाठी पाठविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कलमठ येथील खुशबू स्वयंसहाय्यता बचतगट यांचा मसाले उत्पादन प्रक्रिया व्यवसाय व्हिडिओ राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते वाशी-मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत याबाबतचे प्रमाणपत्र करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर आणि जिल्हा मिशन व्यवस्थापक वैभव पवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले