कणकवली:
कणकवली येथील प्रहार भवन येथे भारतीय जनता पार्टी कणकवली विधानसभा पदाधिकारी आढावा बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत “सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याचं काम केलं जाईल. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पुढील काळात ज्या ठिकाणी बूथ स्तरावर संघटना कमकुवत आहे, त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही आपल्या पाठीशी राहू, आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये शत प्रतिशत भाजपाचा संकल्प ठेवून कामाला लागलं पाहिजे,” असे निर्देश सिंधुदुर्ग पालकमंत्री भाजपा नेते ना. रविंद्र चव्हाण यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर आ.नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आ.अजित गोगटे, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संतोष किंजवडेकर, अमोल तेली, नासीर काझी तसेच भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० कोटीचा निधी जिल्हा नियोजनचा खर्च झालेला आहे. आगामी काळात विविध विकासकामांच्या माध्यमातून निधी खर्च करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सर्वांनी सादर करावेत. भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यात करत असलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत. मोदी सरकारच्या विविध लाभदायी योजना त्याची माहिती प्रत्येक लाभार्थ्याला दिली पाहिजे. त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीने केलेले काम आणि भाजपची धोरणे सांगण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी बजावली पाहिजे असे आवाहन नाम. रविंद्र चव्हाण यांनी केले.
आगामी काळात निधीच्या माध्यमातून विकास कामांसाठी कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. सिंधुदुर्गातील तरुण तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी आपले प्रयत्न असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.