You are currently viewing मनातला रावण आणि आजची सीता (उत्तरार्ध)

मनातला रावण आणि आजची सीता (उत्तरार्ध)

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखीत अप्रतिम लेख*

*मनातला रावण आणि आजची सीता (उत्तरार्ध)*

रावणाला शिक्षा करणारा राम शोधतांना
आजच्या सीतेकडेही दृष्टिक्षेप टाकावा लागेल. काळ बदलला आहे असं म्हणणारी सीता कशी दिसते बरं आज! स्थळ- काळाचं भान न ठेवलेलं अर्धावृत्त शरीर, भडक मेकअप, हातातल्या सिगारेटसह सर्व व्यसनांच्या मर्यादांची लक्ष्मणरेखा पार करणारी आजची सीता…स्त्री-पुरुष समानतेचे झेंडे फडकवायचेच म्हणून मैत्रीच्या सीमारेषा ओलांडणारी आजची सीता…स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार अशी सोयीस्कर समजूत करून घेणारी आजची सीता…आपल्या मादक नजरेने पुरुषांना उघड उघड आव्हान देणारी आजची सीता…कधी घरच्यांच्या पाठिंब्याने, कधी त्यांना विरोध करून, तर कधी लपून-छपून मनाप्रमाणे वागणारी आजची सीता… किंवा मित्र मैत्रिणींच्या दबावाला घाबरून तसं वागावं लागणारी आजची सीता…आणखीही बरंच काही करणारी, करावं लागणारी आजची सीता…

काळ बदलला आहे हे खरंय…पूर्वीसारखं नऊवारी, पाचवारी किंवा आताचा पंजाबी ड्रेसही मागासला वाटावा इतका तो बदललाय…परंतु कुठलाही अंगभर ड्रेस घालणं हेही अति मागासलेपणाचे लक्षण ठरतंय…आणि आपली मुलं काळाच्या मागे राहू नये किंबहुना ती दोन पावलं पुढेच असावीत यासाठी आजचे तरुण पालकही यथाशक्ती प्रयत्न करताहेत…कुठल्याही *सांस्कृतिक* म्हणवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात याची झलक पाहायला मिळते. ज्या शब्दांचे अर्थही कळण्याचे वय नसते त्या वयात प्रेमगीतावर अगदी तसलेच हावभाव करून नृत्य करायला प्रोत्साहन देऊन, तोंडभरून कौतुक करणं, पाश्चात्त्यांच्या भल्या सवयींकडे डोळेझाक करणे आणि बुऱ्या सवयी मात्र आत्मसात करणे, हीच आजची *आपली संस्कृती* होऊ पाहत आहे. कदाचित मुलांना अजाण, अबोध वयातच सर्व प्रकारची जाण यावी असा हेतू असावा किंवा याची जाणीवच नसावी, हे म्हणणेही धार्ष्ट्याचे ठरेल.

घरात आजी आजोबा नसतात आणि आई-बाबांना वेळ नसतो म्हणून मुलांवर संस्कार होत नाहीत असा एक मतप्रवाह सध्या जोर धरून आहे. पण सभोवतालच्या परिस्थितीचा, मिडियाचा पगडा मनावर एवढा असतो की घरात आजी आजोबा असले तरीही त्यांची, आपल्या दृष्टीने जुनाट असलेली मतं कुणालाच पटत नसतात. आणि त्यांना हतबल होऊन ही सर्व परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहुन स्वीकारण्याशिवाय काहीही पर्याय राहत नाही.

या सर्वांवर ‘आम्ही असं आधुनिक राहतो म्हणून टीका करता, पण अगदी छोटी बालिका किंवा अंगभर कपडे घातलेली स्त्री तरी कुठे सुरक्षित आहे’ असा युक्तिवाद केल्या जातो. अर्थात यावर काही उत्तर नसलं तरीही अशा वागण्याचं समर्थन होऊ शकेल काय!

अर्थात् स्त्रिया अशा राहतात आणि म्हणून आम्ही असं बेछुट, बेफाम, बेधुंद वागतो या पुरुषांच्या मताचंही समर्थन होऊ शकत नाही. नवरात्रात स्त्रीरूपीदेवतेच्या मूर्तीचे मनोभावे पूजन करायचे आणि सजीव स्त्रीची मात्र विटंबना करायची, ह्या विरोधाभासाचं काय करावं!

पूर्वीपासूनच स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेत जसा फरक आहे तसाच त्यांच्या स्वभावविशेषातही फरक आहे. आणि आजकालच्या बदलत्या जीवनशैलीने त्याला अजून खतपाणी घातल्या जातंय. वाढतं वय आणि शारीरिक-मानसिक असा सर्वच बाजूंनी येणाऱ्या ताणतणावामुळे होणारा कोंडमारा…त्यामुळे ज्याला जशी वाटेल तशी त्यातून वाट काढणं चाललेलं आहे. ती योग्य की अयोग्य ह्या सारासार विवेकाचा विचार करायला कोणाजवळच वेळ नाही. नैतिकतेच्या पूर्वापार चालत आलेल्या व्याख्या बदलून गेल्याय. आणि यात ओल्याबरोबर सुकंही जळु पहातंय.

समर्थन आणि विरोध या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि कुठल्याही एका बाजूला मत द्यावं अशी परिस्थिती राहिलेली नाही.

त्यामुळे अपवादात्मक असलेले राम….ते मात्र अवाक्, किंकर्तव्यमूढ मन:स्थितीत उभे आहेत……..सीतेचा धावा ऐकण्यासाठी…

पण आजची सीता एक तर धावा करणार नाही. कारण कदाचित तिलाही हे मान्य असू शकेल. आणि केला तरीही रावणच एवढे प्रबळ असतील की रामाचं सामर्थ्य त्यापुढे कमी पडू शकेल. त्यामुळे रामाचा धावा करण्याऐवजी तिला स्वत:ची शारीरिक क्षमता प्रतिकार करण्याएवढी वाढवावीच लागेल. दिखाऊ सौंदर्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे.

आणखीही बरंच काही…. पण कदाचित माझे शब्द हे अरण्यरूदनच ठरेल. तरीही मनातलं लिहावसं वाटलं, इतकंच…….

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
६-१०-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा