मालवण :
केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मालवण रोटरी क्लबच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचा मंगळवारी विशेष सत्कार करण्यात आला.
मालवण नगरपरिषद शहर समन्वयक निखिल नाईक, बांधकाम पर्यवेक्षक सुधाकर पाटकर, लिपिक महेश परब, पाणी पुरवठा अभियंता राजा केरीपाळे यांनाही चांगल्या सेवेबाबत रोटरी क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले. मालवण नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी यांचेही रोटरी क्लब सदस्यांनी कौतुक केले.
रोटरी क्लब अध्यक्ष रतन पांगे यांनी यांनी मुख्याधिकारी जिरगे यांना सन्मानित केले. यावेळी सेक्रेटरी अभय कदम, खजिनदार रमाकांत वाक्कर, माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, बाळू तारी, भाऊ साळगावकर, अनिल चव्हाण, चाचा हडकर, अजय जोशी, ऋषिकेश पेणकर, संदेश पवार, रंजन तांबे आदी उपस्थित होते.