कोल्हापूर जिल्ह्यातील संकल्प फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार यंदा गोमंतकीय साहित्यिक व पत्रकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना जाहीर झाला आहे. क्षीरसागर यांच्या ‘कृतज्ञ पशु आणि पक्षी आनंदते सृष्टी’ या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. क्षीरसागर यांच्या लेखाचे सदर मंगळवेढा येथील दामाजी एक्स्प्रेस या दैनिकात सुरू होते. त्यातील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. निसर्गाचा ऱ्हास आणि पर्यावरणाचे संरक्षणविषयक संदेश देणारे हे लेख आहेत. त्यांचे विपुल लेखन सातत्याने गेली अनेक दशके सुरू आहे. त्यांच्या कथा, कविता, बालकथा, ललितलेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या वर्षी त्यांना मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. या आधी मुंबई येथील दत्तात्रेय कृष्ण सांडू पुरस्कार ‘माणसांची हाव सांगा संपणार तरी कधी’ या पुस्तकाला मिळाला आहे. हे पुस्तक देखील निसर्ग आणि पर्यावरण रक्षणावर आधारित आहे.
श्री. क्षीरसागर यांची साहित्य संपदा विपुल आहे. “माणसांची खैर नाही” या पुस्तकाला बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार मिळाला असून हे पुस्तक धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात बी. कॉम प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला लागले आहे.
‘गर्भावल्या संध्याकाळी’, ‘मातीचे डोहाळे(माती, पाऊस आणि सखी)’, ‘जमाना बदलल्याचं चिन्ह दुसरं काय?’ ‘कवितेच्या जन्मावेळी’ हे कविता संग्रह तसेच ‘झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता(गझलसंग्रह)’ ‘यथा प्रजा तथा राजा(बालकथा)’ ‘आजि म्या कृषक पाहिला (कथासंग्रह)’, ‘सद्गुरू सीताराम महाराज चरित्रामृत ओवीबद्ध ग्रंथ’ आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संकल्प परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सुरु केले आहेत.
सध्या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कोरोनानंतरचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
या पुरस्कारासाठी सर्व साहित्य प्रकारात एकूण १५३ साहित्यकलाकृतींचे प्रस्ताव उपलब्ध झाले होते. लवकरच महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष युवराज आनंदराव सरनोबत, उपाध्यक्षा सौ. आदिती युवराज सरनोबत तसेच सचिव सौ. वैशाली जयंत मिसाळ यांनी दिली आहे.