You are currently viewing गोव्यातून एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का

गोव्यातून एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का

*गोव्यातून एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का*

*राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचा इशारा*

गोवा बनावटीची करमुक्त दारू गोव्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत तस्करी करण्याचे प्रमाण मागील काही वर्षात झपाट्याने वाढले आहे. सावंतवाडी शहरातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग सह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जण गोरगरिबांना भेसळयुक्त दारूच्या नादी लावून गब्बर झाले आहेत. अनेकवेळा मीडियातून गोवा बनावटीच्या दारूविरुद्ध आवाज उठवून राज्य उत्पादन शुल्क खाते तात्पुरती कारवाई करून आपण सतर्क असल्याचे दाखवीत होते परंतु गोवा बनावटीच्या दारू व्यवसायात मात्र झपाट्याने वाढ होताना दिसून येत होती. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी “गोव्यातून एक जरी बाटली महाराष्ट्रात आणल्यास थेट मोक्का लावू” असा इशाराच दिला.
गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय करून अनेकांनी गोंधळ माजवला आहे, ज्यांच्याकडे रस्त्यावर राहणारे म्हणून पाहिले जायचे अशा काहींनी स्वतःचे वजन वाढवून करोडोंचे बंगले उभारले आहेत, आणि जिल्ह्यातील अनेक युवकांना देशोधडीला लावले. सोशल मीडिया, प्रिंट मीडियामध्ये गेली काही वर्षे सातत्त्याने गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर आवाज उठविण्यात येत होता. शेवटी सरकार बदल झाल्यानंतर गोवा बनावटीच्या दारूचा विषय मंत्रिमंडळाच्या पटलावर आला आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी गोव्यातून एक बाटली जरी दारू महाराष्ट्रात आणली आणि एकाच गुन्ह्यात दोन तीन वेळा तोच आरोपी आढळला तर पोलीस प्रशासन ज्याप्रकारे आरोपींना मोक्का लावतात, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांकडे शिफारस करून मोक्का लावण्या बाबत मागणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गोवा राज्य केवळ त्यांच्या राज्यात वाहतुकीसाठी पास/लायसन्स देऊ शकते महाराष्ट्राला ते बंधनकारक नाही, त्यामुळे गोव्यातील दारू महाराष्ट्रात आणली गेली तर त्यात वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आल्याने सिंधुदुर्ग सह उर्वरित महाराष्ट्रातील दारू व्यवसायात कार्यरत असणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असून निर्णयाप्रमाणे कठोर कारवाई होऊन युवा पिढीला देशोधडीला लावणाऱ्यांची गय केली जाऊ नये अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा