सावंतवाडी
जागतिक किर्तीचे जेष्ठ शास्त्रज्ञ, भारताचे भुतपूर्व राष्ट्रपती, भारतरत्न स्व.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस दरवर्षी प्रेरणादिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जि.प.कुणकेरी शाळा नंबर.१ या उपक्रमशील प्रशालेत अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन, सावंतवाडीच्या वतीने आज प्रेरणादिन सामाजिक अंतर पाळून साजरा करण्यात आला.
यावेळी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व चाईल्ड लाईनचे संचालक ॲड.नकुल पार्सेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर भविष्यात राबविले जाणारे उपक्रम आणि त्यात पालक व शिक्षकांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अटल प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मास्क व शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व कवी विठ्ठल कदम यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला गावचे सरपंच विश्राम सावंत, शाळा समीतीचे अध्यक्ष राजन मडवळ, केंद्रप्रमुख म.ल.देसाई, पोषण आहार समीतीचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत सावंत, चाईल्ड लाईनचे समुह सदस्य ॲड.चिन्मय वंजारी, विश्वनाथ सनाम, शाळेच्या शिक्षिका सौ.अस्मिता कासार, सौ. प्रियदर्शनी गावडे, सौ.रश्मी वाडकर आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन सौ.निता सावंत यांनी केले तर आभार सौ.निता सावंत यांनी मांडले.