सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे प्रमोद जठार यांनी केली मागणी
देवगड
सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. याच धर्तीवर छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायमस्वरूपी स्मरणात राहावा, या उद्देशाने जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याजवळ शिवरायांच्या आरमाराचे संग्रहालय साकारावे. यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे सांस्कृतिक व मत्स्य उद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत सदर मागणी पूर्ण करावी, असे साकडे घातले आहे.
आपल्या निवेदनात माजी आमदार जठार म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याजवळ शिवरायांच्या आरमाराचे संग्रहालय साकारावे. कारण ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापूर्वी बांधला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्गे येणाऱ्या फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी जोहर व इंग्रजांचे आकमण थोपवण्यासाठी सुसज्ज आरमाराचे बांधकाम याच किल्ल्याच्या परिसरातील समुद्रात सुरू केले. या आरमाराचे नेतृत्व सरखेल कान्होजी आंग्रे करीत होते. जहाज बांधणी सोबत महाराजांनी या समुद्रात संरक्षण भिंतसुद्धा बांधली. व परकीय आक्रमकांपासून महाराष्ट्राचे संरक्षण केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौसेनेच्या झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘भारतीय आरमाराचे जनक’ असा करून त्यांच्या राजमुद्रेचा समावेश भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये केला. हा सर्व इतिहास आपल्यापुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात व्हावे, ही तमाम जनतेची इच्छा आहे. या संग्रहालयासाठी विजयदुर्ग किल्ल्या शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असून तेथे असलेले रेस्ट हाऊस सध्या उपयोगात नसल्याने या जागेत हे ‘आरमार संग्रहालय’ अत्याधुनिक पद्धतीने व्हावे व राष्ट्र निर्मितीच्या या कार्यासाठी लागणाऱ्या १० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद आपण आपल्या सांस्कृतीक मंत्रालयाकडून करावी व त्या संबंधीची बैठक आपल्या दालनात लावावी, अशी विनंती माजी आमदार जठार यांनी केली आहे.