उदय सामंत यांची सिंधुदुर्गात मोर्चेबांधणी
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ मागील दोन टर्म शिवसेना पक्षाचे उमेदवार विनायक राऊत निर्विवाद वर्चस्व राखून विजयी होत आले आहेत, त्यामूळे कोकण हा शिवसेनेचा गड मानला गेला. परंतु अलीकडेच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले, आणि शिवसेना पक्ष फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जवळपास ६० ते ७० टक्के आमदार, खासदार गेले. त्यामुळे शिवसेना पक्ष खिळखिळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
शिवसेना शिंदेगटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यापासून आपले बंधू कॉन्ट्रॅक्टर किरण सामंत यांच्यासाठी लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरु केली होती. त्यात विनायक राऊत हे अडसर ठरणार होते. परंतु शिवसेना पक्ष फुटीनंतर किरण सामंत यांच्यासाठी मार्ग मोकळा झाल्याने उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे समजते आहे. उदय सामंत सिंधुदुर्गात आपले नेटवर्क स्ट्रॉंग करत असून किरण सामंत हे शिंदेगटाकडून लोकसभेसाठी शिवसेना उमेदवार असतील अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अनेकांचे शिंदेंगटामध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत. याला कारणीभूत उदय सामंत असल्याचे बोलले जात आहे. उदय सामंत यांच्यामुळेच पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळे किरण सामंत यांच्यासाठी उदय सामंत लोकसभा निवडणुकीच्या मॅच साठी पाटा खेळपट्टी तयार करत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.