You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल “क्राईम मुक्तीकडून” कडून “क्राईम डायरीकडे”…

सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल “क्राईम मुक्तीकडून” कडून “क्राईम डायरीकडे”…

विशेष संपादकीय……

सिंधुदुर्ग जिल्हा…. महाराष्ट्राचा दक्षिणेकडील निसर्गरम्य, शांत, सुसंस्कृत जिल्हा. तळ कोकणातील लोक नारळासारखे बाहेरून कडक पण आतून गोड प्रेमाने भरलेले. त्यामुळे जिल्ह्यात आलेले अधिकारी, नोकरदार वर्ग जिल्ह्या सोडून जायला बघत नाहीत. जिल्ह्यात असलेली शांतताप्रिय, समंजस, भोळी माणसे पाहून जिल्ह्यातून बदली होऊन जाणारे पोलीस अधिकारी देखील जिल्ह्याचे कौतुक करतात. त्यामुळे पोलिसांच्या डायरीत सिंधुदुर्ग जिल्हा हा लो-क्राईम असलेला जिल्हा अशी जणूकाय म्हणच प्रचलित झाली आहे.
खरंच आजकाल सिंधुदुर्ग जिल्हा लो-क्राईम असलेला जिल्हा राहिलाय का?
सिंधुदुर्गातील लोक तेव्हाही शांतताप्रिय आणि समजदार होती आणि आजही आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या कामधंद्यात व्यस्त असतो, एकमेकांच्या सुखदुःखात सोबत असतो, परंतु “आपण आणि आपले काम” ह्या उक्तीनुसार चालणारा जिल्हावासीय कधीच दुसऱ्यांच्या विषयात पडत नाही, कोण चुकत असेल तरी ज्ञान शिकवत नाही. दुसऱ्यांच्या लफडयात तर अजिबात टांग घालत नाही. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत गुन्हे क्वचितच घडत होते.
जिल्ह्यातील शांतताप्रिय, समाजभिमुख लोकांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप काही करण्याची वेळ इथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कधीच आली नाही. काही गावांमध्ये असणारे हातभट्टी सारखे गावठी दारू धंदे सुद्धा एस.पी. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या कारकिर्दीत उध्वस्त करून टाकले होते. त्यामुळे तदनंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तीच शांतता, आणि गुन्हेगारीचा उतरता आलेख अबाधित राखण्याचीच जबाबदारी होती. परंतु जबाबदारीचे भान नसलेल्या पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याच्या दुर्लक्षामुळे किरकोळ वाटणारे प्रसन्ना यांच्या कार्यकाळात बंद झालेले जिल्ह्यातील दारू मटका सारखे धंदे त्यानंतर जास्तच फोफावले. दारू, मटका यांच्या साथीला तर ड्रग्स ने सुद्धा जिल्ह्यात यशस्वी पुनरागमन केले. गावठी दारू बंद झाली परंतु गोवा बनावटीच्या भेसळयुक्त दारूचा महापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याचा कानाकोपऱ्यात वाहू लागला.
जिल्ह्यातील लो-क्राईम स्थितीचा गैरफायदा घेत जिल्ह्यात छोट्या छोट्या अनेक अनैतिक, अवैद्य धंद्यांनी हातपाय मजबूत रोवले. त्यामुळे कधीकाळी छोटे वाटणारे हे दारू सारखे अवैद्य धंदे आज इतके मोठे झाले आहेत की जिल्ह्यात पैशाने गब्बर झालेल्या, माजलेल्या लोकांकडून गुंडागिरीला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती पुढे सुरू राहिली तर सर्वसामान्य लोकांच्या घरातील बाया, स्त्रिया, मुलींना रस्त्यावर फिरणे मुश्किल होऊन जाईल अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. कायदा सुव्यवस्था आज पैसेवाल्या अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या हाताचे खेळणे बनू लागली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शांततेच्या नावावर तरुणाईच्या माकडाचेष्टा बघण्यापेक्षा लोकांनी स्वतः स्वतःची सुरक्षा करत तरुणाईचे वाचाळ चाळे बंद करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे आज वैयक्तिक नागरिकांना त्रास देताना दिसत नाहीत, परंतु जसे आजकाल काही घरातील तरुण पोरं दारू व्यावसायिकांच्या आमिषाला बळी पडत अवैद्य धंद्यांकडे वळत आहेत ते पाहता भविष्यात प्रत्येक घरात एक अवैद्य धंदे करणारा गुन्हेगार जन्म घेऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु अजूनही आपण अवैद्य धंद्यांचा आपल्याला त्रास होत नाही ना? हाच विचार करून दुर्लक्ष करतो. शेजारचा दारू धंदा करतो, मटका चालवतो, करू दे पाहिजे ते, तो बघून घेईल, खेळणारे खेळतील, पिणारे पिऊन मरतील. आपल्याला काय सुख दुःख? दिवसेंदिवस सरकारी कामात भ्रष्टाचार वाढतो आहे, परंतु आपली कामे होतात ना? असाच विचार करून आपण आपल्या कामात व्यस्त राहिलो. त्यामुळे समाज पोखरत चालला आणि आपण मात्र मस्तीत जीवन जगत राहिलो. परंतु शांतताप्रिय, समंजस अशी बिरुदे लावून आपण आपल्याच आजूबाजूला जन्मणाऱ्या जन्मणाऱ्या छोट्या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा स्वतःच्या कुटुंबावर अस्मानी संकट कोसळते तेव्हा डोक्याला हात लावून बसतो.
जिल्ह्यात आज तरुणांकडून घडणारे गुन्हे किव्हा तरुण पिढी अवैद्य, अनैतिक धंद्यांकडे ओढली जाते हे नवीन नाहीय. गेली अनेकवर्षं याचा पाय घातला जात आहे. कोवळ्या मुलांना गाड्या फिरवणाऱ्या, पैसेवाल्या लोकांचे आकर्षण, त्यामुळे त्यांच्या कंपूत गेल्यावर “धर पान, सिगारेट घेऊन ये” अशी १०/२० रुपयांच्या कामासाठी १०० ची नोट देत ऑर्डर देणारे माल मिळताच उरलेले पैसे मात्र ठेव तुला. असे सहज सांगत हळूहळू कोवळ्या मुलांना पैशांचे आमिष दाखवतात आणि गैरधंद्यांकडे ओढतात. कित्येक पालकांचा मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने ते गैर धंद्यांमध्ये सराईत होतात, व्यसनी बनतात. त्यातूनच आंबोली घाटातील महिलेचा खून, माजगाव घरफोडी, सारखे अनैतिक गुन्हे उदयास येतात. मध्यंतरी सावंतवाडीत ड्रग्स घेताना मिळालेली मुले, मुली, कुडाळ मधीलही श्रीमंतांची शाळेतील मुलांची गॅंग दारू, गांजा ड्रग्स यांच्या आहारी गेली आहे, त्यात काही मुलीसुद्धा आहेत. कुडाळ येथील मंदिराची फंडपेटी फोडण्याच्या गुन्ह्यात मिळालेली पोरांची टोळी आजकाल ड्रग्स च्या आहारी गेलेली दिसते आहे. कुडाळ एमआयडीसी परिसरात दारू, गांजा सेवन करणारी, सिगारेट ओढणारी कोवळी मुले मुली कित्येकदा रंगेहात पकडलेली आहेत. काही लोक हे प्रकार रोखताना दिसत आहेत, परंतु बराचसा समाज मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. परिणामी भविष्यात त्यांच्याही कुटुंबावर अशी वाईट वेळ येते तेव्हा मात्र हे प्रकार रोखण्यास वेळ गेलेला असतो.
कित्येकदा अनैतिक धंद्यात गुंतलेल्या मुलांना रोखल्यावर त्यांची गॅंग त्यांना रोखणाऱ्यावर हल्ला करणे, इजा पोचविणे इत्यादी प्रकार घडताना दिसतात त्यामुळे कित्येक लोक अशा अनैतिक धंद्यात गुंतलेल्या मुलांकडे दुर्लक्षच करतात. अलीकडे लॉकडाऊनमध्ये मुलांना कामधंदा नाही म्हणून ते अवैद्य धंद्यांकडे ओढले गेले. अशी ओरड ऐकू येते, परंतु हे आजकाल एका रात्रीत घडलेले नसून लॉकडाऊन मध्ये घडले म्हणून सांगत एक पळवाट तयार केली गेली. परंतु शांतताप्रिय जिल्हा आणि समाज म्हणून आपल्याच दुर्लक्षामुळे आज समाजास ही कीड लागलेली आहे. भविष्यात मिसरूड न फुटलेली ही मुले, मुली देखील याहून भयाण परिस्थितीतून जातील आणि समाजात विषवल्ली पसरेल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाने आजच उठाव करून पसरणारी ही विषवल्लीची पाळेमुळे ठेचून काढली पाहिजेत. ही जबाबदारी एकट्या पोलीस यंत्रणेची नसून आपली सुद्धा आहे याचं भान प्रत्येक नागरिकाने ठेवलं पाहिजे.
आज पोलीस प्रशासनावर आरोप होतो, मीडियाने सुपारी घेतली की काय असा संशय घेतला जातो आहे, परंतु ही टीका किंवा आरोप नसून जिल्ह्यातील एक पिढी बरबाद होत चालली असल्याने जिल्ह्यातील मुलांच्या भवितव्यासाठी चाललेला प्रामाणिक प्रयत्न आहे. एकवेळ होती जिल्ह्यात मल्लिकार्जुन प्रसन्ना हे पोलीस अधीक्षक असताना जिल्ह्यातील जनता पोलीस प्रशासनावर आरोप करत होती का? या प्रश्नावर सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. उत्पादन शुल्क विभाग दारूच्या अवैध्य धंद्यांकडे कानाडोळा करतो आहे, परंतु तेच दारू व्यापारी त्यांच्या जीवावर उठतात तेव्हा पथके आणून त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. हेच काम सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलं गेलं तर त्यांच्यावर आरोप होतील का? त्यामुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने दाखल झालेले राजेंद्र दाभाडे यांची देखील जबाबदारी वाढलेली असून जिल्हा पुन्हा लो-क्राईम अवस्थेकडे नेण्यासाठी त्यांचेही प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजेत.
आज जिल्ह्यात एका महिलेचा शरीरसुख घेत असताना मस्तीत गळा दाबून झालेला खून ही अनैतिक, अवैध्य धंद्यांच्या मार्गाने आलेल्या पैशांची मस्ती, मग्रुरी आहे. आज एका महिलेचा खून झाला की हे प्रकार थांबणार नसून भविष्यात गुन्हेगारीकडे ओढलेल्या या तरुण मुलांकडून याहूनही गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुनाच्या गुन्ह्यातून न्यायालयीन कोठडी मिळताच तोच संशयित आरोपी पुन्हा माजगाव परिसरातील दुसऱ्या घरफोडी प्रकरणात आरोपी म्हणून समोर येतो म्हणजे चुकीच्या दिशेला चुकून गेलेली ही तरुणाई नसून जाणूनबुजून त्यांनी पैसा कमविणे हेच उद्दीष्ठ समोर ठेऊन केलेलं हे दुष्कर्म आहे. दारू धंद्यात ओढले गेलेल्या या अल्पवयीन मुलांकडून अगदी निर्ढावल्यासारखे खुनासारखे प्रकरण करून ते दडपून टाकण्याची केलेली तयारी पाहून ही मुले म्हणजे गुन्हेगारीचा कळस गाठलेली असल्याची शक्यता वाटते.
समाजात वाढत चाललेल्या तरुणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे फक्त पोलीस प्रशासनाने ध्यान दिले पाहिजे हा समज दूर करून आज समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी म्हणून समाजात फोफावत जाणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीस ठेचून काढण्यासाठी दोन पाऊल पुढे आले पाहिजे. तरच गुन्हेगारीच्या या भस्मासुराचा नाश होऊन एक सुसंघटित सुसंस्कृत समाज जन्मास येईल अन्यथा भविष्यात आपल्या घरातील बायका, मुलींना समाजात ताठ मानेने फिरणे देखील मुश्किल होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा