कुडाळ येथील व्हेईकल एक्सपो उपक्रमाचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र शासन दरवर्षी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी सुमारे १०० कोटीची तरतूद करत आहे. मात्र या महामंडळा अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत नाही. या योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मराठा महासंघ सिंधुदुर्गने व्हेईकल एक्स्पोचे आयोजन केले हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
सध्या बॅंकांमध्येही स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेचा फायदा ग्राहकांनी घेतला पाहिजे. त्यासाठी देखील असा एक्स्पो होणे गरजेचे होते. या संधीचा फायदा घेऊन नागरिकांनी आपली आर्थिक उन्नती साधावी . घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी. डिफॉल्टर यादीत आपले नाव येता नये यासाठी काळजी घ्यावी.असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने मराठा उद्योजक डिरेक्टरी उपक्रमांतर्गत कमर्शिअल व्हेईकल एक्सपो २०२२ हा अभिनव उपक्रम २८, २९, ३० सप्टेंबर या कालावधीत रवी कमल मंगल कार्यालय,कुडाळ बस डेपो समोर भरविण्यात आला. या एक्सपोचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.उपक्रमाला पहिल्याच दिवशी युवा उद्योजक तसेच वाहन व्यावसायिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम सिंधुदुर्ग अँटो रिक्षा चालक मालक संघटना व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेंपो, टैंकर, बस वाहतूक महासंघ, मुंबई या संघटनांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एग्रीकल्चरचे ललित गांधी, राजापूर अर्बन बँकचे कार्यकारी संचालक शेख कुमार अहिरे यांनी आपले विचार व्यक्त करत युवा उद्योजक तसेच वाहन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस वाहतूक महासंघ उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष संजय शारबीद्रे, सुंदर सावंत, मनोहर येरम, बंड्या सावंत, धीरज परब, शैलेश घोगळे, अनुपसेन सावंत, वैभव जाधव, हर्ष पालव, रवींद्र राऊळ, संग्राम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.