You are currently viewing सर्वांच्या सहकार्यातून पर्यटन विकासाला गती मिळेल-विष्णू मोंडकर

सर्वांच्या सहकार्यातून पर्यटन विकासाला गती मिळेल-विष्णू मोंडकर

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील पर्यटनाला खूप वाव आहे. फक्त शासकीय पातळीवर पर्यटनाचा विकास होणार नाही तर त्यासाठी लोकसहभाग आणि संस्था यांच्या सहकार्यातून पर्यटनाचा विकास शक्य आहे असे मत पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केले.


सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्यावतीने दिनांक २७ सप्टेंबर या “जागतिक पर्यटन दिना”च्या निमित्ताने पर्यटनाचा पुनर्विचार या संकल्पनेवर आधारित ‘कोकणचे पर्यटन- दशा आणि दिशा’ या विषयावर श्री.विष्णू मोंडकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. सदर कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रकाशजी नारकर यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मिट ॲपव्दारे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. यावेळी मोंडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन दोन दशके झाली. या काळात फारसा विकास झालेला दिसत नाही.परंतु पुन्हा एकदा केंद्र सरकारने २०२२ मध्ये या जिल्ह्याला दत्तक घेतले आहे. पर्यटनाच्या विकासातून रोजगार निर्मितीसाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यटनाकडे व्यवसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. यासाठी शासन अनुकूल आहे. कोकणामध्ये फक्त चार-पाच महिन्याचा हंगाम असतो परंतु वर्षभर हे पर्यटन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजातील व्यक्ती, व्यावसायिक आणि संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास येथील पर्यटनाचा विकास शक्य आहे असे सांगितले.
कोकणातील पर्यटनाचा विचार करता येतील समुद्रकिनारे, येथील ऐतिहासिक वास्तू व किल्ले, जुनी मंदिरे, घाट रस्ते, कृषी पर्यटन, सांस्कृतिक व खाद्य संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत असे अध्यक्ष भाषणात श्री प्रकाश नारकर यांनी सांगितले.
या ऑनलाईन कार्यक्रमाला जिल्ह्यातील पर्यटन संबंधित व्यक्ती, व्यवसायिक व गिर्यारोहण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.संजीव लिंगवत यांनी करून दिली तर प्रश्न प्रश्नोत्तराचे सत्र डॉ.गणेश मर्गज व डॉ.कमलेश चव्हाण यांनी सांभाळले. शेवटी सहसचिव श्रीमती दीप्ती मोरे यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा