You are currently viewing सावंतवाडी-माठेवाडा परिसरात दिवसाढवळ्या गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार…

सावंतवाडी-माठेवाडा परिसरात दिवसाढवळ्या गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार…

परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण; योग्य तो बंदोबस्त करा, बबन साळगावकरांची मागणी…

सावंतवाडी

माठेवाडा परिसरात तब्बल पंधरा गव्याचा कळप दिवसाढवळ्या मुक्त संचार करीत आहे. त्याच्या सोबत तीन पिल्ले असल्यामुळे ते आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. दरम्यान याबाबत वनविभागाने तात्काळ दखल घेवून गवे भरवस्तीत येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

नरेंद्र डोंगर परिसराला लागून असलेल्या माठेवाडा-झिरंग भागात गेले काही दिवस हा गव्यांचा कळप दिवसाढवळ्या फिरत आहे. काल सायंकाळी माठेेवाडा येथील भगवान नाईक यांच्या घरासमोर त्या कळपाने हजेरी लावली. भरवस्तीत गवे आल्याने परिसरातील अनेकांची पाचावर धारण बसली. दरम्यान आरडाओरड केल्यानंतर तो कळप जंगलाच्या दिशेने पळून गेला. यात तब्बल पंधरा मोठ्या गव्यांसह तीन पिल्लांचा समावेश आहे. दरम्यान गव्यांनी आपली हजेरी भरवस्तीत लावल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. भरवस्तीत येणार्‍या गव्यांपासून हल्ला अथवा कोणताही अनुचित प्रकार होवू शकतो. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष श्री. साळगावकर यांनी ही आक्रमक भूमिका घेतली असून त्या गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, परिसरात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. नरेंद्र डोंगर परिसरात तसेच मळगाव-माजगाव येथील जंगल परिसरात त्यांचे वास्तव्य आहे. परिसरात शेती असल्यामुळे ते जंगलातून खाली उतरतात. त्यांच्याकडुन झालेली नुकसानी आम्ही निश्चितच मिळवून देवू, परंतू ते आक्रमक होतील असे वर्तन कोणी करू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा