उद्या मालवण येथे रंगीत तालीम: किनारे सफाईसाठी कृती आराखडा
एनएसएस,एनसीसी,एनजीओ यांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी
सिंधुदुर्गनगरी
अपघातग्रस्त ‘पार्थ’ मधून सुरु झालेल्या तेल गळतीबाबत कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरव्दारे सिंधुदुर्ग ते गोवा रेकी करण्यात आली. यात 8 सागरी मैलांवर तेलाचे तवंग दिसले. समुद्र किनाऱ्यावर तेल आल्यास करावयाच्या उपाय ओजनेसाठी उद्या शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी मालवण येथे रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले आहे. तेल गळतीच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्वतयारी प्रशासनामार्फत करण्यात येत असून, किनारे सफाईसाठीचा आवश्यक कृती आराखडा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत आहे. विविध अशासकीय संस्था, NSS आणि NCC विभागा यांनी मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्तीने पुढे येवून आवश्यकता लागल्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मी.लांबीचे तेलवाहू जहाज दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी अपघातग्रस्त झालेले होते. कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सदर जहाजातून दि.१९ सप्टेंबर २०२२ पासून तेल गळतीस प्रारंभ झालेला आहे.
कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार आज दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी कोस्ट गार्ड च्या Advance Light Helicopter मधून सिंधुदुर्ग ते गोवा किनारपट्टी भागाची रेकी करण्यात आलेली आहे. तेलाचा तवंग पसरल्यास किनारपट्टीचा कोणता भाग सर्वात जास्त बाधित होणार आहे याची पाहणी करण्यासाठी सदरील रेकी होती. सदरच्या रेकी नुसार ८ सागरी मैलांवर तेलाचे पॅचेस कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर ला दिसून आलेले आहेत.
सदर अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलेले असून तेल समुद्र किना-यावर आल्यास त्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणाना देण्यात आलेल्या आहेत. सदर अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांची बैठक आणि तेल किना-यावर आल्यास त्या बाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत रंगीत तालीम काल दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी देवगड येथे आयोजित करण्यात आलेली होती. तसेच दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी मालवण व वेंगुर्ला तालुक्यासाठी मालवण येथे रंगीत तालीमिचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रंगीत तालीमिच्या दरम्यान कोस्ट गार्ड रत्नागिरी चे सहाय्यक कमांडिंग अधिकारी श्री.सचिन सिंग हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
आज दि.२२ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे आणि प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला येथे किनारी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीत तेल किना-यावर वाहून आल्यास करावयाच्या उपाययोजना, किना-याची सफाई, सफाईतून एकत्र केलेल्या टाकावू पदार्थांची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भाने आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. उद्या दि.२३ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तालुक्यातील किनारी भागातील यंत्रणांची बैठक होणार आहे.
मत्स्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार आज दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी मत्स्य विभागामार्फत गस्ती नौकेद्वारे मालवण ते देवगड समुद्रात १२ सागरी मैलापर्यंत पाहणी करण्यात आली. सदर पाहणीवेळी मत्स्य विभागासोबत बंदर विभाग, वन विभाग व पोलीस विभागाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सदर टीम कडून समुद्री पाण्याचे नमुने, माशांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.