शिवसैनिकांच्या उद्रेकाला शासन जबाबदार राहील – तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा
सावंतवाडी
ठाकरे घराण्या विरोधात बेताल व्यक्तव्य करणाऱ्या शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांचा आज सावंतवाडीत शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. यावेळी निषेध बॅनर वरील प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कदमांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, शिवसैनिकांचा उद्रेक झाल्यास त्याला शासनच जबाबदार राहील, असा इशारा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या समोर हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी चंद्रकांत कासार,बाळा गावडे, मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, सुनिता राऊळ, गितेश मुळीक, राजू शेटकर, प्रगती बामणे, शिवदत्त घोगळे, संदीप गवस, नामदेव नाईक, समीरा खलीब, सचिन पालक, संतोष मेस्त्री, चंद्रकांत गावडे, रामचंद्र कुबल, मंगेश धुरी, अनिषा चिले, नंदा सावंत, अर्चना बोंद्रे, श्रेया कासार, मनाली परब, राजू कुबल, प्रकाश सनाम, सुनिल गावडे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याविरोधात काल एका कार्यक्रमात बेताल वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आज सावंतवाडीत हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बोलताना श्री. राऊळ म्हणाले, महाराष्ट्रात गद्दारांचे सरकार आले आहे. शिंदे गट हे त्यांचे एक पिल्लू आहे. त्यांच्यातीलच एका रड्या आमदाराला ठाकरे घराण्यावर बोलणे शोभत नाही. कदम यांनी ठाकरेंविरोधात बेताल वक्तव्य करून अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रकार पुन्हा घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर भाजप शिंदे गटाला पुढे करू घाणेरडे राजकारण करत आहे. वाढत्या महागाईला भाजपच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना जनताच धडा शिकवेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी श्री. कासार म्हणाले, कदमांनी स्वतःला आवर घालावा. आम्ही शिवसैनिक कोणाला घाबरणार नाही. हा प्रकार पुन्हा घडल्यास जशास तसे उत्तर देऊ. शिवसैनिक शांत आहेत. त्यांना कोणी डिवचू नये, अन्यथा शिवसैनिकांच्या उद्रेकाला शासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.