जागतिक ओझोन दिन ‘ कार्यक्रमात वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांचे कासार्डे विद्यालयात प्रतिपादन
तळेरे: प्रतिनिधी
आजकाल वाहने आणि उद्योग-धंद्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात, विशेषत: मुंबई सारख्या भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर थेट वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर प्रदूषणाचे परिणाम आणखी धोकादायक बनू शकतात. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. ओझोनचा थर आपल्या पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. या थराला होणाऱ्या नुकसानीमुळे लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याची माहिती सामाजिक वनीकरण कणकवली विभागाचे वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांनी कासार्डे येथे विद्यार्थ्यांना दिली.
सामाजिक वनीकरण विभाग कणकवली व राष्ट्रीय हरित सेना माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून श्री.विनोद बेलवाडकर बोलत होते.
याप्रसंगी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, खारेपाटण-फोंडाघाट विभागाचे वनपाल श्री शिवाजी इंदूलकर, राष्ट्रीय हरित सेनेचे विभाग प्रमुख अनंत काणेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,पी.जे. काळे,सांगवे वनरक्षक कु.राजश्री शेवाळे, पराग सावंत आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम.डी. खाड्ये यांनी करताना हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आणि त्याप्रमाणे जनजागृती करणे ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी ही माहिती पालकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन करीत, उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
चौकट
ओझोनचा थर कमी झाला तर होणारे दूष्यपरिणाम…
मानवीला त्वचारोग, कर्करोग, आणि लवकर वृद्धत्व येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात , तसेच वनस्पतीच्या पानाचा, फळाचा,आकार कमी होणे. पिकांच्या उत्पादन घटणे आणि परागीभवनावरही परिणाम होतो. खारफुटी जंगलावर मोठा परिणाम होतो. प्राणी, पक्षी यांच्यावरही मोठा परिणाम होतो.ओझोन वायुंचा तर काही होत असल्याने ध्रुवावरील बर्फ वितळण्यावर परिणाम होत असून तेथील सजीव धोक्यात आले आहे. भरपूर बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे जगभरातील भूभाग कमी होत आहेत असे बेलवाडकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राष्ट्रीय हरित सेना कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख अनंत काणेकर यांनी मानले.
जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून कासार्डे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर सोबत प्राचार्य खाड्ये व इतर मान्यवर