वेंगुर्ले:
वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूल येथे दिनांक १३ व १४ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गटांमध्ये दाभोली नंबर २ शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. गटविकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती वेंगुर्ले माननीय श्री.विद्याधर सुतार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. श्री चिपकर यांनी स्वतः बनवलेल्या अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठीच्या मोबाईल ॲप साठी त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. सदर मोबाईल ॲप हे अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या सरावासाठी तसेच त्यांच्या आत्मविश्वास वृद्धीसाठी उपयुक्त आहे .प्रशांत चिपकर हे दाभोली नंबर २ शाळेचे उपक्रमशील पदवीधर शिक्षक असून कोरोना काळातही शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या SCERT विभागामार्फत राबविल्या गेलेल्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे.त्यांनी मिळवलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशाबरोबरच त्यांची निवड जिल्हा स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे .याबद्दल वेंगुर्ला तालुका गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष गोसावी, विस्तार अधिकारी,श्री. बाक्रे मॅडम, केंद्रप्रमुख श्री.प्रमोद गावडे, मुख्याध्यापक श्रीमती मराठे, सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.