जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांचा इशारा
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणाला हानी पोहोचविणारा एक खनिज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील भातशेती तसेच घरांचीही हानी होणार असल्याने याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायतने अशा पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या प्रकल्पाला परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिला आहे.
आजगाव ग्रामपंचायत हद्दीत 11.4 किलो मीटर क्षेत्रफळावर एका खनिज कंपनीचा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आजगाव ग्रामसभेकडून एनओसी आवश्यक आहे. मात्र पूर्वेक्षण करताना अनुदान क्षेत्रातील जमीनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक होणार असल्याने याला जबाबदार कोण राहणार असा सवाल राजन मुळीक यांनी केला. अशीच प्रक्रिया मळेवाड, धाकोरा मध्येही सुरू असल्याचे श्री. मुळीक यांनी सांगितले.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वीच खनिज कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बागायती, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु नंतर भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा नैसर्गिक आपत्तीचे कारण सांगत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या अशा प्रकल्पांना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला असल्यामुळे असे पर्यावरणास हानी पोहचविणारे प्रकल्प आजगाव, मळेवाड, धाकोरा परिसरात नको अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी केली आहे.
प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर सदर खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा राजन मुळीक यांनी दिला.