माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खा.सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कोंकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा रेल्वेस्थानकातील तिकीट बुकिंगची सुविधा कोंकण रेल्वेकडून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लांजा परिसरातील गोरगरीब रेल्वे प्रवाशांना त्याचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे लांजा परिसरातील प्रवाशांकडून लांजा रेल्वेस्थानकातील तिकीट बुकिंगची सुविधा पूर्ववत करावी अशी मागणी केली आहे.
खा. सुरेश प्रभू यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, लांजा हा परिसर आपण ज्या राजापूर मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलो त्या मतदारसंघात येत असल्याने आपली विनंती प्राधान्याने घेतल्यास आपल्याला आनंद होईल.
खा.सुरेश प्रभू हे जरी स्थानिक पातळीवर फिरताना दिसत नसले तरी आपल्या पूर्वीच्या मतदारसंघातील लोकांच्या विनंतीस मान देऊन जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. येत्या काहीच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून खा.सुरेश प्रभू यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.