You are currently viewing युवतीने वाढदिवसाला दिला कृतीशील सामाजिक आयाम !

युवतीने वाढदिवसाला दिला कृतीशील सामाजिक आयाम !

 

इचलकरंजी येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील वैभवी आढाव या युवतीने तिच्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला.तसेच याबाबतचा अर्ज भरुन आपल्या वाढदिवसाला कृतीशील सामाजिक आयाम देत समाजाला चांगला संदेश दिला आहे.

हल्ली तरुणाई नेमकी कुठे जात आहे असा समाजमनाला प्रश्न पडत असताना वैभवी आढाव या युवतीसारखे विवेकी युवक – यवती मात्र मरणोत्तर देहदान चळवळीत सहभागी होवून समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेऊन समाजात आदर्श घालून देत आहेत.
आपण हयात असताना सामाजिक देणं म्हणून आपण समाजसेवा किंबहुना सामाजिक प्रबोधन करत राहिले पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या मरणानंतरही आपला उपयोग समाजासाठी व्हावा या सामाजिक बांधिलकीच्या हेतूने वैभवी आढाव या युवतीने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या निर्णयाला तिच्या पालकांचा केवळ पाठिंबाच नाही तर त्यांनी देखील त्यांच्या मुलीच्या निर्णयाचे अनुकरण करत स्वतःचेही मरणोत्तर देहदानाचे अर्जही भरले आहेत. वैभवी ही डीकेएएससी इचलकरंजी काॅलेजच्या विवेकवाहिनीची कार्यकर्ती आहे.
सामाजिक भान राखून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणारी फारच अत्यल्प तरूण पिढी आज समाजात आहे. पण वैभवीने हा निर्णय घेऊन आणि तिच्या समवयीन युवक – युवतींना अशा पध्दतीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करत एक परिवर्तनशील पाऊल उचलले आहे. तिच्या या निर्णयाचे तिचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती आणि विवेकवाहिनी या सामाजिक संघटनेकडूनही कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा