कुडाळ :
कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयांमध्ये जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त आयोजित मोफत भौतिकोपचार तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ येथील सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन मकरंद परुळेकर उपस्थित होते. इतरांच्या वेदना मुक्तीचा आनंद आपल्याला फार मोठे समाधान देते. वैद्यकीय सेवा ही आर्थिक समाधानाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक राजमार्ग आहे. रुग्णांसाठी शरीरावरील वाईट परिणाम टाळून शारीरिक वेदना दूर करण्यासाठी फिजिओथेरपी ही एक उत्तम उपचार पद्धती आहे.”असे उद्गार परुळेकर यांनी काढले.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये अस्थिव्यंगाच्या ऑपरेशन, उपचार पद्धती नंतर रुग्णाला सुव्यवस्थित करण्यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा होणारा उपयोग फार मोलाचा असतो. हे सांगत औषधांच्या दुष्परिणामांपेक्षा व्यायामाने व विविध स्नायूंच्या शारीरिक, अवयवांच्या हालचालीच्या सरावामुळे रुग्ण बरा होऊ शकतो. यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा रुग्णांना चांगला लाभ होतो. शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रयत्नातून कुडाळसारख्या छोट्या शहरांमध्ये फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू झालेले आहे. त्यासाठी डॉक्टर सुरज शुक्ला व त्यांचे सहकारी डॉ. शरावती शेट्टी, डॉ.प्रगती शेटकर व त्यांचे सहकारी जे मोलाचे कार्य करत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा डॉ.सुरज शुक्ला यांचे आरोग्यम क्लिनिक व बॅ.नाथ पै शिक्षण संस्था तसेच बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्था जे प्रयत्न करत आहेत; ते फार उपयुक्त व स्तुत्य आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन सिंधुदुर्ग वासियांसाठी एका विना वेदना उपचार पद्धतीद्वारे शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त होवो.” अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, डॉ. शरावती शेट्टी, डॉ. प्रगती शेटकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डॉ. मकरंद परुळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित रुग्णांच्या वतीने व विविध मान्यवरांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 80 रुग्णांनी मोफत भौतिकोपचार तपासणी व उपचार घेतले. याचवेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्था, त्यांचे पदाधिकारी-अजिंक्य शिंदे, प्रशांत जाधव, मानसिंग पाटील यांच्या सहकार्याने पार पडलेल्या रक्त तपासणी शिबिरामध्ये सुद्धा शंभरच्या वर गरजू रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कर्मचारी प्रसाद कानडे, त्यांचे सहकारी यांनी मोलाचा सहभाग उचलला होता.