*ऍथेलेटिक्स क्रीडा प्रकारात पूर्वाने मिळविले सुवर्णपदक*
*सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी केले पूर्वाला सन्मानित..*
*भडगाव वासीयांकडून पूर्वाचा गुणगौरव व शुभेच्छांचा वर्षाव*
खेलो इंडिया युथ गेम्स ऍथेलेटिक्स या क्रीडा प्रकारात तिहेरी उडी मध्ये कु. पूर्वा हितेश सावंत हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर पुढील काही महिन्यात ती या क्रीडा प्रकारात आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तिच्या या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे. तिने मिळविलेले हे यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. पूर्वा ही कुडाळ तालुक्यातील भडगावची रहिवाशी असून ती आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत घाटकोपर येथे वास्तव्याला आहे.
तिचे वडील श्री. हितेश सावंत हे मुंबई येथील नामांकित बिल्डर्स त्यामुळे सुशिक्षित व सुसंस्कारिक कुटुंबामध्ये वाढलेल्या पूर्वाने शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्व दिले. तिची खेळातील आवड लक्षात घेऊन आई वडिलांनी व शिक्षकांनी तिला प्रोत्साहित केले. व अत्यंत कष्टाने तिने हे यश संपादन केले.
या यशाचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा. के मंजुलक्ष्मी यांनी पूर्वाला सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविले तर आपल्या मुलीने अपार मेहनतीने एवढा मोठा नावलौकिक मिळविला व भारतात भडगावचे नाव पसरविले या सार्थ अभिमानाने भडगाव वासीयांनी पूर्वाला कौतुकाची शाल पांघरून गौरविले व तिला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय खेळाडू पूर्वा हितेश सावंत सध्या बंगळुरू मधील भारतीय खेळ प्राधिकरण या ठिकाणी द्रोणाचार्य विजेते प्रशिक्षक बॉबी जॉर्ज यांच्याकडे एशियन गेम्स साठी तयारी करत आहे.