पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांत खूप भरीव कामगिरी केलेली आहे. गोव्यातील भाजप सरकारनेही पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्याचा मोठा विकास साधला आहे
केंद्र आणि राज्य सरकारच्या या विकासकामांमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजप शंभर टक्के जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट-तानावडे, खासदार विनय तेंडुलकर , माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, सरचिटणीस दामोदर नाईक व उपाध्यक्ष बाबू कवळेकर उपस्थित होते. राणे म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या.
150 जागांवर भाजपचे उमेदवार अवघ्या काही मतांनी हरले. या 150 पैकी 100 जागा जिंकण्याचे ध्येय ठेवून केंद्रातील 70 मंत्र्यांवर प्रत्येकी दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपल्याकडे दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई अशा दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून या दोन्ही ठिकाणी आपण यश मिळवणार आहे. आपण दक्षिण गोव्यात काम सुरू केले आहे. नेते व मुख्य कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. दक्षिण गोव्यात भाजपचे नऊ व सहकारी पक्ष व अपक्ष मिळून 12 आमदार आहेत. 20 मधील 12 आमदार म्हणजे विजय पक्का आहे. तरी आम्ही गाफील राहणार नाही, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. लोकसभेचे उमेदवार कोण ते भाजपचे केंद्रीय नेते ठरवतील, आपण फक्त प्रचाराचा भाग आहोत असे उत्तर उमेदवाराबाबत विचारले असता राणे यांनी दिले. गोव्यामध्ये 200 कोटीचे प्रशिक्षण केंद्र लघू आणि सूक्ष्म उद्योग खात्यातर्फे गोव्यात 200 कोटी खर्च करून कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून बोरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या खात्याच्या विविध योजनांचा लाभ गोवेकरांना देण्यात येणार आहे, असे उत्तर राणे यांनी एका प्रश्नावर दिले.