You are currently viewing गुरू ऋण ….

गुरू ऋण ….

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमतीताई पवार लिखित अप्रतिम लेख*

*गुरू ऋण ….*

१९६१ साली मी सातवीत माझ्या माहेरी कापडणे गावी
होते. मी एकटीच सातवीत मुलांच्या शाळेत होते. ही
परिस्थिती का उद् भवली ते तेंव्हा मी लहान असल्यामुळे व
नंतर विषयच झाला नाही म्हणून मला माहित नाही .
तुम्हाला आश्यर्य वाटेल अशा काही गोष्टी मी तुम्हाला
सांगणार आहे.आमचे गुरूजी एकनाथ गुरूजी . शाळा हाच
त्यांचा ध्यास होता.हो, पूर्वी असे ध्येयवेडे लोक होते. सकाळी
सात ते रात्री १२ आमची शाळा असे. तेंव्हा गावात वीज नव्हती.
कंदिल चिमण्यांवर कारभार चाले.

सकाळचे शाळेचे वर्ग संपले की घरी जाऊन पटकन जेवण
करून लगेच शाळेत यायचे. गुरूजी वर्गातच असत .
लगेच आमची दोन सातवीच्या तुकड्यांची (फक्त) शाळा
पुन्हा सुरू होई.. ती सहा वाजे पर्यंत चाले. सर्व विषय
आलटून पालटून शिकवले जात. किंवा रिव्हिजन होई.
एकदा नागरिक शास्राचा तास होता. लोकसभा व विधान
सभा म्हणजे काय ? त्यांचे कामकाज कसे चालते हे
गुरूजींना शिकवायचे होते. ( आता ही मी मला वर्गात
बसलेली व गुरूजी शिकवतांना दिसताहेत). गुरूजींनी
मुलांचे दोन गट केले. लोकसभा व विधानसभाच वर्गात
भरवली व प्रत्यक्ष कामकाज कसे चालते.. वगैरे सर्व बाबी
प्रत्यक्षिकातूनच समजाऊन दिल्या.त्या डोक्यात फिट्ट
बसल्या. कधी ही विसरू शकलो नाही .

वर्गात त्यांचा भयंकर दरारा होता. प्रश्नोत्तरे पाठ करावी
लागत नाही तर … बाप रे ! आता ही अंगावर काटा येतो
इतके मारायचे. ह्या बाबतीत ते भयंकर कठोर होते. पाठ
झालेच पाहिजे असा त्यांचा हट्टच असे. वर्गात दोन विद्यार्थी
फार “ढ “ होते. फार मार खायचे ते ! आमच्या कडून बघितले
जात नसे. मला या गोष्टींचा भयंकर मानसिक त्रास व्हायचा.मी
गावातील स्वातंत्र्यसैनिक व गावचा सर्व कारभार बघणारे,
ज्यांच्या शिवाय गावाचे पान ही हलत नसे अशा क्रांतिकारी
विष्णुभाऊ पाटलांची मुलगी असल्यामुळे व वर्गात मी
एकटीच मुलगी असल्यामुळे बहुधा मला मार बसला नसावा.
अवघ्या११/१२ वर्षाची आम्ही मुले. धड काही न कळण्याचं
ते वय होतं.पण त्यांच्यापुढे बोलायची टाप नव्हती.बुधवार व
शनिवार पटांगणात अत्यंत कडक शिस्तीत आठवडे पेपर
व्हायचे. ग्रोसच्या ग्रोस पेपर चे गठ्ठे थप्पी लावून ठेवलेले असत.

रात्री चारी बाजुने कंदिल समोर ठेवून आम्ही मुले अभ्यास
करीत असू व मध्यभागी खाटेला मच्छरदाणी लावून ते
आमच्यावर लक्ष ठेवून असत. कागदाच्या अगदी पातळ
तावांवर सुवाच्य अक्षर असलेल्या मुलांकडून सारे व्याकरण
त्यांनी उतरवून घेतले होते ते एकमेकात आम्ही पाठ केले होते. निबंध
आणि व्याकरण झोपेतही पाठ म्हणून दाखवू शकत होतो
इतकी तयारी ते करवून घेत. रात्री १२ वाजता दोन विद्यार्थी
कंदिल घेऊन मला घरी पोहोचवायला येत मग ते घरी जात
असत.

बघता बघता परिक्षा आल्या नि आम्ही सर्व विद्यार्थी शेजारच्या
सोनगीर या गावी परिक्षेला गेलो.(आमच्या गावात परिक्षेचे केंद्र
नव्हते).रिझल्टच्या तारखा जवळ आल्या नि पोटात खड्डा पडायला लागला. एकदाचा निकाल जाहिर झाला नि कापडणे
गावात एकदम धूम धडाका उडाला…..मंडळी..
भूतो न भविष्यती असा आमच्या दोन्ही तुकड्यांचा निकाल
लागला होता. रामदास वाघ नावाचा आमच्या वर्गातील
अत्यंत हुशार मुलगा धुळे जिल्ह्यात १ ला आला होता. व दुसराही विद्यार्थी भानुदास व्यंकट पाटील हा जिल्ह्यात दुसरा
आला होता .. वा वा वा .. लोक आनंदाने नुसते वेडे झाले होते.
दोन्ही तुकड्यांचा १००/. टक्के निकाल तर लागलाच पण सर्व
विद्यार्थी दोन अपवाद वगळता ७०/. टक्यांच्या पुढे होते. जे दोन (मार खाणारे) ते ही ५६/. मिळवून पास झाले होते.
शाळेत सारा गाव जमला. माझे वडील विष्णुभाऊ पाटील
यांनी गुरूजींसह विद्यार्थ्यांचाही सत्कार केला, नि निघाली
ती ढोल ताशे लेझीम यांच्यासह जंगी मिरवणूक!
सत्कारार्थी बैलगाडीत व सारा गाव माझ्या वडिलांसह बाजूने
चालत गावभर मिरवणूक फिरली नि शेवटी झेंडाचौकात आली. नेहमी प्रमाणे वडिलांचे कौतुकाचे जोरदार भाषण झाले नि सभेची सांगता झाली.
खूप दिवस गावाला हा इतिहास गप्पा मारायला पुरला.
गूरूजींच्या कष्टाचे चिज झाले होते नि गाव ही धन्य झाला
होता.

नाजुक परिस्थिती मुळे खूप मुले लगेच शिक्षक झाले.
हो, पूर्वी फायनल झाल्यावर लगेच नोकरी मिळत असे.
नंतर त्यांनी ट्रेनिंग घेऊन ते नोकरीत स्थिरावले. फक्त आम्ही
दोघेच उच्च शिक्षण घेऊ शकलो
धन्य ते गुरूजी नि … धन्य ते विद्यार्थी …

“ कालाय तस्मै नम:….”

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा