You are currently viewing अमरावतीची मराठी साहित्यसृष्टी समृद्ध करणारा अवलिया…..

अमरावतीची मराठी साहित्यसृष्टी समृद्ध करणारा अवलिया…..

आज ९ सप्टेंबर डॉ. मोतीलाल राठी यांच्या जयंतीनिमित्ताने….

अमरावती

आज ९ सप्टेंबर. डाँ. मोतीलाल राठी यांच्या जयंतीचा दिवस .आज मोतीलाल राठी आमच्यात नाहीत. पण रहे ना रहे हम महका करेंगे या गाण्याप्रमाणे अमरावतीकर त्यांची आठवण करीत आहेत आणि करत राहणार आहेत .अतिशय प्रामाणिकपणे जीवन जगणारा स्वतः उच्चभ्रू कुटुंबातील असूनही सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा एक माणूस म्हणजे डॉ. मोतीलाल राठी .आज अमरावतीचे साहित्य विश्व हे समृद्ध आहे. त्यासाठी डॉ.मोतीलाल राठी यांना मानाचा मुजरा करावा लागेल .खरं म्हणजे कथा, कविता,कवी संमेलने,साहित्य संमेलने मैफिली याचा सूत्रधार कोणीतरी प्राध्यापक पाहिजे होता. तो मराठीचा असला तर फार चांगलं. पण अमरावतीला आमच्या पिढीतील साहित्यिकांना मदतीचा हात दिला. त्यांचं जीवन समृद्ध केलं. प्रसंगी त्यांना नोकऱ्या दिल्या. वेळोवेळी साहित्य संमेलने मैफिली साहित्यिक कार्यक्रम आयोजित करून अमरावतीची साहित्यिक चळवळ समृद्ध करण्यासाठी डॉ. मोतीलाल राठी यांनी जे परिश्रम घेतले ते शब्दातीत आहे .
आजच्या पिढीमध्ये साहित्य क्षेत्रात गाजत असलेले नावलौकिकास आलेले साहित्यिक कवी लेखक हे घडविण्यामध्ये डॉ. मोतीलाल राठी यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. खरं म्हणजे आजच्या डॉ. लोकांना तर साहित्यिक उपक्रमाकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही. पण अतिशय मोठा डॉक्टर असूनही शिवाय विदर्भ महारोगी सेवा मंडळ या मोठ्या संस्थेच्या कार्यकारणीत असूनही तसेच श्री. गणेशदास राठी शिक्षण समिती या मोठ्या शैक्षणिक संस्थेत असूनही या माणसाने साहित्यिक चळवळीसाठी स्वतःला झोकून दिले होते .सर्वात महत्त्वाचं त्या काळात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन नव्हते, टाऊन हॉल नव्हता त्या काळात डॉ. मोतीलाल राठी यांनी आपला मांगीलाल प्लॉट रोडवरील “मोहर “हा बंगला या कार्यक्रमासाठी विनामूल्य चहापान अल्पोहारासहित साहित्यिकांना अर्पण केला होता .एवढेच नाही तर त्यांची गाडी आणि ड्रायव्हर या चळवळीसाठी नेहमी तयार असायचे.आमच्यासाठी सेवेत असायचे. याप्रसंगी मला डॉक्टर साहेबांच्या अर्धांगिनी आदरणीय कमलताईसाहेबांचेही मनापासून आभार मानाचे वाटतात. ५०-६० लोकांचा चहा नाश्ता पाणी हे सर्व त्या माऊलीने मोठ्या मनाने सहन केले. आज आपल्याकडे दोन-चार पाहुणे आले तर आजच्या पिढीला ते सहन होतीलच असे नाही .पण कुठलाही कार्यक्रम असला तरी चार पाच तास जाणारच. येणाऱ्यांची वर्दळ. त्याची पूर्वतयारी सतरंज्या टाकणे, व्यवस्था करणे, पाण्याची व्यवस्था अल्पोपहाराची व्यवस्था चहाची व्यवस्था आणि ते गेल्यानंतर हाँल स्वच्छ करणे ही सगळी कामे कमलताईच्या मार्गदर्शनाखाली व्हायची . डॉक्टर साहेबांनी ऑर्डर सोडली म्हणजे कमलताई देखील काही बोलू शकत नव्हत्या .डॉक्टरसाहेबांचा स्वभाव त्यांना माहीत होता. खरं म्हणजे अशी माणसं दुर्मिळच असतात .आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही डॉ. राठी नियमितपणे बुधवार ला तपोवनला यायचे. त्या काळात तपोवनला जाण्याचा धाडस देखील कोणी करीत नव्हतं .माझ्या स्वतःच्याच बहिणीचे लग्न मी तपोवनला राहतो म्हणून होत नव्हतं. अशी परिस्थिती होती .कारण तपोवन म्हटलं म्हणजे कुष्ठरोग .कुष्ठरोग म्हणजे महारोग आणि हा काहीतरी भयंकर रोग आहे अशा लोकांचा समज होता. परंतु त्या काळात डॉ. मोतीलाल राठी यांनी खऱ्या अर्थाने पदमश्री दाजी साहेबांच्या पटवर्धनांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. खरं म्हणजे शिवाजीराव उर्फ दाजी साहेब पटवर्धन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे फारच कठीण कार्य .मी दाजीसाहेबांना फार जवळून पाहिलेले आहे .अतिशय शिस्तप्रिय कडक आणि सत्यवचनी असा हा माणूस. पण या माणसाच्या पसंतीला जी काही माणसं उतरली त्यामध्ये डॉ. मोतीलाल राठी यांचा समावेश आहे. कारण हा माणूस खरा माणूस होता. जिवंत माणूस होता. संवेदनशील माणूस होता .माझ्यावर तर त्यांनी स्वतःच्या पुत्रासारखे प्रेम केले. कोणी त्यांना चुकूनही सांगितले की काठोळे सरांना बरं नाही. तर त्यांना कळल्यापासून पंधरा मिनिटाच्या आत ते माझ्या निवासस्थानी हजर व्हायचे. इतका जिव्हाळा इतका ओलावा. खरं म्हणजे मी सुरुवातीला त्यांच्या संस्थेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत होतो. पण मला प्राध्यापक करण्यासाठी डॉ. मोतीलाल राठी यांनी सर्वस्व पणाला लावले. खरं म्हणजे नात्याने ते माझे गाव जावाई लागतात .कमलताई ह्या सातेगावच्या. सातेगाव हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक छोटेसे गाव. माझे वडील कासट परिवारामध्ये घरगडी म्हणून काम करीत होते .पुढे त्याच कासट परिवाराने माझ्या वडिलांना श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये नोकरी लावून दिली. पुढे वडील वारल्यानंतर मी त्या संस्थेमध्ये वडिलांच्या जाग्यावर कामाला लागलो .माझ्या साहित्यिक गुणामुळे डॉ.मोतीलाल राठी आमच्याशी जुळत गेले .मी बबन सराडकर, मुरलीधर घाटोळ, अरुण सांगोळे,गंगाधर पुसतकर, शिवा इंगोले ह्या सगळ्या मंडळींना कळत नकळत डॉ. मोतीलाल राठी यांच्याशी जुळत गे ली .मला आठवते की श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालया मध्ये प्राचार्यांच्या जागा निघालेल्या होत्या आणि एक मारवाडी प्राध्यापक माझ्याकडे आले .त्यांनी प्राचार्य पदाचा अर्ज भरलेला होता .ते मला म्हणाले . सर डॉक्टर साहेबांना माझ्याबद्दल सांगा .ते अध्यक्ष आहेत.ते तुमच्या म्हटल्याने ऐकतात .मला नवल वाटले की त्या प्राध्यापकांना इतका आत्मविश्वास होता की नरेश काठोळे जे सांगतील ते डॉ. मोतीलाल राठी ऐकतील. तेवढे ऋणानुबंध मी निर्माण केले होते .साहित्य संगमला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यामध्ये डॉ. मोतीलाल राठी यांनी आपले प्राण पणाला लावले. १९७६ ला साहित्य संगमची स्थापना झाली. तेव्हा मी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये नोकरीला लागलो होतो .डॉक्टरसाहेबांचा त्या काळात मोठा दरारा होता .एक फार मोठा डॉक्टर . फार मोठ्या समाजसेवी माणूस. पण आम्ही त्यांच्याशी आमच्या साहित्यिक गुणांमुळे नकळत जुळल्या गेलो. त्या काळात आमच्या विद्यार्थी दशेत डॉक्टर साहेबांच्या डायनिंग टेबलवर आम्ही जेवण करीत होतो .म्हणजे संस्थेच्या प्राचार्याला किंवा प्राध्यापकालाही डॉक्टर साहेबांची पायरी चढायला जिथे विचार करावा लागत होता तिथे मी त्या पायऱ्या केव्हाच पार केल्या होत्या.याला कारण डॉक्टरसाहेबांचा कमलताईंच्या स्वभाव. खरं म्हणजे त्यांनी अमरावतीच्या साहित्य विश्वात एवढं काम केलं की प्रा. मधुकर केचे म्हणायचे की यांचे नाव राठी नाही मराठी असायला पाहिजे .स्व.सुरेश भटांच्या पडत्या काळात जर त्यांना कोणी सावरण्याचे काम केले असेल तर त्यामध्ये डॉ. मोतीलाल राठी हे एक नाव आहे.सर्वश्री अरविंद ढवळे, मीनाताई ढवळे,दादा इंगळे वली सिद्धीकी,रामदासभाई श्राफ ही सुरेश भटांची मित्रमंडळी. पण यामध्ये श्री अरविंद ढवळे मोतीलाल राठी आणि दादा इंगळे यांनी आपला वेळ बंगला गाडी सगळी सुरेश भटांच्या चरणी अर्पण केली होती. मला आठवते की माझ्या पिढीतील ज्या लोकांनी नगर वाचनालयात झालेला आणि साहित्य संगमने सादर केलेला रंग माझा वेगळा हा कार्यक्रम ऐकला असेल तो अजूनही त्यांच्या स्मरणात असेल. सुरेश भटांचे महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झालेत. पण अमरावतीच्या नगर वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाला तोड नव्हती. कारण सुरेश भटांची जन्मभूमी अमरावती. सुरेश भटांचे लंगोटी मित्र अमरावतीचे .नगर वाचनालया मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. इतकी गर्दी. त्या काळात एवढी प्रचंड गर्दी लाभलेली आणि
अतिशय उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कार्यक्रम. तेव्हाच्या पिढीला अजूनही स्मरत असेल असा हा कार्यक्रम . एखादा माणूस फार तर पैसा देईल पण वेळ देणार नाही .स्वतःचा बंगला तर देणारच नाही .आमचे अनेक कार्यक्रम डॉ. मोतीलाल राठी यांच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेले आहेत. स्वतः बॅडमिंटन खेळण्यासाठी तयार केलेला हॉल त्यांनी साहित्य संगमच्या हवाली केला. वर्गणीसाठी हा माणूस कधीही नटला नाही. खरं म्हणजे त्या काळात अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन घेणे म्हणजे तारेवरची कसरत. शिवा इंगोले माझ्याकडे आले आणि मला डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेले .डॉक्टर साहेबांनी स्वतःचं धन स्वतःचं मन आणि स्वतःची गाडी पूर्ण साहित्य संमेलनासाठी झोकून दिली. श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये अमरावतीला संपन्न झालेले हे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन त्यामुळे आजही लोकांच्या स्मरणात आहे. झाले बहु होतील बहु परंतु या सम हा असेच डॉक्टर साहेबांबद्दल म्हणावे लागेल. मी सांगितले आणि डॉक्टर साहेबांनी ऐकले असे समीकरण होऊन गेले होते. त्यामुळे मी अनेक लोकांना नोक-या लावू शकलो. डॉक्टरसाहेब श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमध्ये अध्यक्ष होते. तेव्हाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. के जी देशमुख होते .केजी देशमुख आणि डॉ. राठी हे अतिशय जवळचे मित्र. त्यामुळे आम्ही श्री गणेशदास राठी छात्रालयामध्ये आणि अमरावती विद्यापीठामध्ये आमच्या काही जवळच्या पण चांगल्या मित्रांना नोकऱ्या देऊ शकलो. आज तीही माणसे सेवानिवृत्त झालेली आहेत. पण डॉक्टर साहेबांनी त्यांना नोकरी लावून जे आर्थिक पाठबळ दिलं. त्यामुळे ती आज आर्थिकदृष्ट्या धडधाकट झालेली आहेत.आमच्या परिवाराला समृद्ध करण्यामध्ये तर डॉक्टर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मला प्राध्यापक लावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली . श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये मराठीची जागा निघाली तेव्हा ती जागा नरेशलाच मिळाली पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता .त्यासाठी त्यांनी स्वतःची पूर्ण प्रतिष्ठा कामाला लावली .खरं म्हणजे ते काम अवघडच होतं. नियमातही बसणार नव्हतं. परंतु आज जर नरेश प्राध्यापक लागला नाही तर भविष्यात कदाचित लागू शकणार नाही. कदाचित एवढा समृद्ध होऊ शकणार नाही .असे त्यांना मनमोहन वाटत होते .म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि माझ्यासाठी तेव्हाचे अध्यक्ष श्री शंकरलालजी राठी यांच्याजवळ शब्द टाकला. नुसता शब्दच टाकून ते बसले नाहीत तर शंकरलालजी राठींना सांगितले की आजच्या सभेचे अध्यक्षपद मला द्या. आणि मला त्यांनी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये लावून घेतले. माझ्याकडे सिनेमा टॉकीज मध्ये गेट कीपरची नोकरी मागायला आलेल्या साहेबराव थोरात याला त्यांनी वलगावच्या एस एल हायस्कूलमध्ये चांगली मानाची नोकरी मिळून दिली. ममता इंगोले नावाच्या मुलीला श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमध्ये नोकरी लावून दिली .त्यासाठी त्यासाठी स्वतःचा शब्द वापरला. मला आठवते मी प्राध्यापक लागलो. पण मला मान्यता मिळत नव्हती. त्यासाठी डॉक्टर साहेबांनी जंग जंग पिछाडलं.काही अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. काही मंत्र्याजवळ शब्द टाकला आणि मला मान्यता मिळवून दिली.आणि म्हणून डॉ.मोतीलाल राठी आणि आम्ही एकाच कुटुंबातले एकाच रक्ताचे एकाच नात्याचे आहोत असे समीकरण त्या काळात लोक वर्तवीत होते .आणि ते खरेही होते. रोज सायंकाळी आम्ही नियमितपणे डॉक्टर मोतीलाल राठी यांच्या मोहर बंगल्यावर एकत्र असायचं .त्यामध्ये अमर अग्रवाल सुखदेव लढ्ढा, अरविंद ढवळे, विश्वजीत तुळजापूरकर ही मित्रमंडळी एकत्र यायची .आमचे नाश्ता चहापाणी चालायचं आणि डॉक्टर साहेबांची दवाखान्यात जाण्याची वेळ होईपर्यंत मग आमच्या गप्पासप्पा चालायच्या. बरेच वेळा डॉक्टर साहेब आणि मी आम्ही दोघेच असायचो. माझ्या आणि डॉक्टर साहेबांच्या गप्पा रंगायच्या .डॉक्टर साहेबांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांना कारचा प्रवास जमत नव्हता. पण डॉक्टर साहेबांनी कधीही कोणालाही त्रास दिला नाही. मीच पुढाकार घेऊन बरोबर डॉक्टरसाहेब दवाखान्यात जायची वेळ झाली की माझी गाडी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे जायचा व त्यांना दवाखान्यात पोहोचून द्यायचा आणि डॉक्टर साहेबांचा दवाखाना संपायच्या वेळेस बरोबर गाडी त्यांच्या हॉस्पिटल समोर उभे राहायचा. डॉक्टर साहेबांना मनोमन वाटत होतं की हे चुकत आहे. ते मला म्हणायचे नरेश तू ही एवढी काळजी करू नकोस .मला आँटोने जाता येता येते .पण मला ते मानवत नव्हतं . या पितृतुल्य माणसाला शेवटची मानवंदना देताना मी त्यांच्या जवळ होतो .त्यांना कानाचा कॅन्सर झालेला होता .असह्य वेदना ते सहन करीत होते .मला आठवते दवाखान्यात भरती होण्यापूर्वी विदर्भ महारोगी सेवा मंडळाचा तपोवन येथील कार्यकर्ता श्री रमेश कुदळे त्यांना भेटायला आलेला होता. डॉक्टर साहेबांना बरं नव्हतं .पण फाटक वाजले. मी सांगणार होतो की डॉक्टर साहेबांना बरं नाही .तुम्ही नंतर या. पण फाटक वाजल्या बरोबर मला ते म्हणाले .नरेश कोण आलं आहे .डॉक्टर साहेबांसमोर खोटं बोलणे शक्यच नव्हतं.तपोवनचा माणूस आहे. डॉक्टर साहेब म्हणाले पाठवा त्याला . मी म्हणालो डॉक्टर साहेब तुम्हाला बरं नाही आहे .डॉक्टर साहेबांनी चेहरा केविलवाणा केला. आणि मला म्हणाले पाठव. मी रमेश कुदळे यांना आत घेऊन आलो. डॉक्टर साहेबांची माझी ती शेवटची भेट .दुसऱ्या दिवशी त्यांना दवाखान्यात भरती करावं लागले . ते बेशुद्ध झाले. एक दिवस झाला दोन दिवस झाले आणि अचानक ती काळ रात्र आली .आम्ही दवाखान्यातच होतो. मी आणि विद्या. आमच्याबरोबर प्रतीक होता .मध्यरात्र झाल्यामुळे आम्ही प्रवीणला कमलताईंना घरी जायला सांगितले .आम्ही पहारा देतो म्हणून सांगितलं आणि अचानक प्रतीकने धावपळ सुरू केली. डॉ. चोरडीयांना बोलावलं .दवाखान्यामध्ये धावपळ सुरू झाली आणि काही क्षणातच डॉक्टर साहेबांनी प्राण सोडले .अमरावती शहरावर अमरावतीच्या साहित्यिक विश्वावर प्रेम करणारी एक साहित्यिक ज्योत कायमची मालवली.मित्रांनो डॉ. मोतीलाल राठी डॉक्टर असूनही त्यांनी अमरावतीचे साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी मागं पुढं पाहिलं नाही. स्वतः कविता न लिहिणारा स्वतः लेख न लिहिणारा हा माणूस साहित्यावर साहित्य चळवळीवर प्रेम करीत होता. त्याने हे साहित्य विश्‍व खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी हातभार लावला .आज डॉ. मोतीलाल राठी आमच्यात नाहीत.पण मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे रहे ना रहे हम महका करेंगे या ओळीप्रमाणे त्यांनी काम केले. त्या काळातील आम्ही जे साहित्यिक मंडळी आहोत .त्यासाठी या मंडळींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आम्हाला जे आर्थिक मानसिक साहित्यिक बळ दिलं. त्या बळामुळे आज अमरावती क्षेत्रातील जे नावाजलेले कवी आहेत साहित्यिक आहेत लेखक आहेत त्यांना फार मोठे पाठबळ मिळालेलं आहे .त्यांना पंख मिळालेले आहेत आणि हा पंख देणारा माणूस आज आमच्यात नाही आहे .परंतु आम्ही पुढे चालू हा वारसा या न्यायाने आम्ही काम करीत आहोत आणि करणार आहोत. डॉ. मोतीलाल राठी यांना हीच खरी आदरांजली ठरेल .
==============
*प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे**
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकॅडमी अमरावती.9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा