कणकवली
देवगड तालुक्यातील साळशी – कुवळे मार्गावर एसटी महामंडळाची देवगड रेंबवली एसटी बस (एम.एच. १४ बी.टी १५७८) व क्वालिस कार (एम.एच.०४ – बी.वाय २५९६) ही साळशी ते शिरगांव जात असताना २ वाहनांमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टीतील सुमारे १० प्रवासी तर क्वालिस मधील १० प्रवासी मिळून २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काही गंभीर प्रवाशांना कणकवली, कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एसटीतील ४ प्रवाशांना व क्वालिस मधील २ प्रवाशांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत वृत्त असे की, देवगड तालुक्यातील साळशी – कुवळे मार्गावर एसटी व क्वालिसमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात क्वालिस मधील रामदास बबन गांवकर (वय – ४२, रा – साळशी, ता. देवगड), देवाय रामदास गांवकर (वय – ७, रा – साळशी, ता. देवगड), तर एसटीतील प्रवासी राजश्री रामचंद्र परब (वय – ५५, रा – गडीताम्हाणे, ता. देवगड), संजना जगन्नाथ तर्फे (वय – २०, रा – कुवळे, ता. देवगड), संदेश पांडुरंग घाडी (वय – ३८, रा – चाफेड, ता. देवगड), प्रियांका प्रकाश पवार (वय – ४२, रा – कुवळे, ता. देवगड) यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींच्या डोक्याला, डोळ्याला , हातापायांना दुखापत झाली आहे. या अपघाताचे वृत्त समजल्यानंतर विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपुस केली तर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण यांनी रुग्णालयात दाखल जखमींची माहिती घेत जबाब नोंदवले आहेत. या अपघातातील जखमींवर परिवहन विभागाकडून मोफत औषध उपचार केले जात आहेत.