सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोकणातील विद्यार्थी अधिकारी बनू शकतात, एवढी क्षमता या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे मत ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या चळवळीचे प्रणेते तथा कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी येथे व्यक्त केले. सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित व्याख्यानात रेडकर बोलत होते.
यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर, प्रदीप रेडकर, ज्येष्ठ शिक्षक संतोष वैज, एनसीसी ऑफिसर गोपाल गवस, माजी विद्यार्थी विष्णू शिरोडकर, निलेश पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात सत्यवान रेडकर पुढे म्हणाले की, मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकाऱ्यांचा जिल्हा व्हावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मला या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व पालकांची साथ हवी आहे, मात्र खेदाने म्हणावेसे वाटते की, अनेकदा येथील विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये प्रचंड न्यूनगंड पहावयास मिळतो, हे योग्य नसून माझ्या जिल्ह्याला अधिकाऱ्यांचा जिल्हा बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर येथील पालक व विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे अत्यावश्यक आहे. आगामी काळात शासकीय नोकऱ्यांच्या प्रचंड संधी उपलब्ध असून येथील विद्यार्थ्यांमध्ये अधिकारी बनण्याची पुरेपूर क्षमता आहे. फक्त मार्गदर्शनाच्या अभावामुळे येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे आहेत, असेही रेडकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ठाकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद कोलगावकर यांनी केले.