You are currently viewing पाच दिवसांच्या श्रीगणेशाचे सावंतवाडीत थाटात विसर्जन

पाच दिवसांच्या श्रीगणेशाचे सावंतवाडीत थाटात विसर्जन

 

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा अनेक बंधनांमध्ये साजरा केला गेला. परंतु यावर्षीचा गणेशोत्सव मात्र धुमधडाक्यात श्रींचे स्वागत करून मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून आले. या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असून देखील आपल्या लाडक्या गणपतीचे घरोघरी मोठ्या भक्तीभावाने पूजन केले गेले. पाच दिवस गणपतीचे घरात असलेले वास्तव्य म्हणजे प्रत्येक दिवसाला, क्षणाला घरात आनंद लहरी असण्यासारखेच असते. अशावेळी गोडधोड नैवेद्य दाखवून पाचही दिवस आरती भजने आदींच्या माध्यमातून श्रीगणेशाची सेवा केली जाते. पहिल्या दिवशी विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते आणि पाचव्या दिवशी दुपारी महाप्रसादाचे (म्हामदे) आयोजन करून सायंकाळी श्रीगणेशाची उत्तरपूजा करतात.

सावंतवाडीत सायंकाळी काही उशिरानेच श्रीगणेश मिरवणुका निघाल्या. सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात अनेक गणेश मूर्तींचे ढोल ताशांच्या पथकांसह फटाक्यांच्या आतिशबाजीत विसर्जन करण्यात आले. नगरपालिकेकडून तलावात विसर्जनासाठी कर्मचारी व बोटीच्या सहाय्याने योग्य नियोजन करण्यात आले होते. विसर्जनाच्या वेळी सावंतवाडी पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सावंतवाडीतील अनेक घरगुती गणपतीचे भाविकांनी जड अंत:करणाने विसर्जन करत “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा प्रकारची विनवणी करून बाप्पांना निरोप दिला. श्री गणेशाला निरोप देण्यासाठी सावंतवाडी मोती तलावाचे काठ भाविकांनी गजबजलेले दिसत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा