२५ हजार नवीन उद्योजक तयार करून ७५ हजारांना रोजगार…
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि पर्यायाने कोकणात येत्या सहा महिन्यात पर्यावरण पूरक उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ७५ हजारहून लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. दरम्यान आडाळी, कासार्डे व वैभववाडी येथील एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने लवकरच बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
श्री. सामंत यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच वेंगुर्ल्यात आपल्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, येणाऱ्या काळात माझ्या मंत्रिपदाचा उपयोग हे जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणाच्या विकासासाठी करणार आहे. यावेळी कोकणाला ताकदीने मदत करणार आहे. आडाळी-दोडामार्ग येथे उपलब्ध असलेल्या जागेत मोठे उद्योग आणण्याचा मानस आहे. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय मोपा एअरपोर्ट होत असल्याने गोव्यातील बरेचसे उद्योजक या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांची मदत घेतली जाणार आहे. या ठिकाणी त्यांना उद्योग उभारण्यासाठी जमिनी देताना ८०% रोजगार हा स्थानिकांना मिळाला पाहिजे, अशी अट घालण्यात येणार आहे. आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यात होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कासार्डे येथे असलेल्या एमआयडीसीत फूड प्रोसेसिंग युनिट केले जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री यांच्या खात्याच्या माध्यमातून एखादे कॉलेज सारखे प्रकल्प उभारता येऊ शकतो का? याचा विचार सुरू आहे. वैभववाडी येथे ३० एकर जागा एमआयडीसी साठी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी ही सर्वच्या सर्व जागा एका उद्योजकाला किंवा १५ एकर मिळून दोन उद्योजकांना देऊन त्या ठिकाणी साखर कारखान्या सारखे उद्योग येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जास्त उद्योग जिल्ह्यात यावेत येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.