“चांगलं काम करा…” केसरकरांचा सल्ला
सावंतवाडी….गोवा राज्याच्या सीमेला लागून असलेला तालुका… त्यामुळे अनेकदा गोवा राज्यातून होणाऱ्या गोवा बनावटीच्या करमुक्त अवैद्य दारूच्या तस्करीमुळे सावंतवाडी पोलीस खाते लक्ष्य केले जाते. दारू हा विषय जरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीत असला तरी सर्वसामान्य लोकांचा पोलीस खात्यावर जास्त विश्वास असतो. त्यामुळे सावंतवाडी पोलीस निरीक्षक हे लोकांसाठी केंद्रबिंदू असतात.
सावंतवाडी शहर परिसरात अनेक ठिकाणी युवकांकडून बिनधास्तपणे दारूची विक्री केली जाते त्यामुळे युवा पिढी बरबाद होत चालली आहे. शहराच्या आजूबाजूच्या काही भागांमध्ये जुगाराचे अड्डे बसतात, मैफिली जमतात. शहराची शान असणाऱ्या उद्यानाच्या कोपऱ्यात सुद्धा दारू, जुगाराचे अड्डे बसलेले असतात. बाजारपेठेत अनेक स्टॉल, टपरीवर मटक्याचे उद्योग सुरू असल्याने अनेकांनी कामधंदे सोडून जुगार मटक्यावर लक्ष केंद्रित केला आहे. सावंतवाडीचे पो.नि. कोरे यांच्या कारकिर्दीत घडलेल्या खून, चोऱ्या आदी प्रकरणांमुळे सावंतवाडी शहर चर्चेत आले होते. तर काही राजकीय घडामोडींमुळे सावंतवाडी शहराची शांतता भंग पावल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नवे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यावर सावंतवाडी तालुक्यातील अवैद्य धंद्यांना आळा बसविण्याचे आणि शहरात शांतता, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन असेल. नाम.दीपक केसरकर यांच्या सदिच्छा भेटीत नाम.केसरकरांनी पो.नि. मेंगडे यांना “चांगले काम करा” असा दिलेला सल्ला म्हणजे सूचक इशाराच की काय? असेही चर्चिले जात आहे.