*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*सेवा भाव ….*
किती महान शब्द आहे, तुलनाच नाही,इतका महत्वाचा.
अगदी जन्मापासूनच तो आपल्या परिचयाचा असतो.
आपल्या जन्माचं मूळच सेवा आहे.आपण अगदी जुन्या
वैदिक काळात गेलो तरी, किंवा रामायण महाभारत ह्या
काळात डोकावलो तरी सर्वत्र हेच सेवाभावाचे चित्र आपल्याला
दिसते.सेवाभावाचे अत्युच्च उदा. म्हणजे हनुमान व भरत.
हे दोघे सेवाभावाचे परमोच्च बिंदू आहेत. आणखी एक कथा
आपल्याला माहित आहे ती श्रावण बाळाची.तशी जगात
सेवाभावी माणसांची अगणित उदा.आहेत यात शंकाच नाही.
आपले आश्रमवासिय सर्व ऋषी मुनी सेवाभावाचे आदर्श
प्रतिक आहेत. वैदिक काळात वशिष्ठ विश्वामित्रांसह रेणुका व जमदग्नी ही सारी मंडळी सेवाभावातूनच माणसाला माणूस
बनवण्याचे काम करत होते.
जमदग्नी व रेणुका तर उत्तरेतील आश्रमातून खास माणूस
घडवण्यासाठी व संस्कृती निर्माण करण्यासाठी नर्मदा तीरी येऊन राहिले व माणसाला खाणाऱ्या माणसाला त्यांनी माणूस
बनवले. रात्रंदिवस अफाट कष्ट करून त्यांनी माणूस घडवला
माणसांची सेवा करून त्याला शेती पिकवायचे कसब शिकवले.ही सेवा मानवी इतिहासातील परमोच्च सेवा होती
यात शंकाच नाही.हजारो ऋषी मुनिंनी माणसाला वैदिक धर्म
शिकवून विद्या दानाचे महान कार्य केले.धर्मग्रंथांचे उपनिषदांचे
मर्म समजावले.आपल्या पूर्वजांचे ऋषीमुनिंचे संतांचे संस्कारच
सेवाभावाचे होते. पुत्र तर कोणतीही तोशिष माता पित्यांना
लागणार नाही याची काळजी घेत असे. या बाबतीत रामायण
महाभारत आपले आदर्श आहेत व ठाई ठाई त्याच्या खुणा
आपणास दिसतात.
फ्लॅारेन्स नाईटिंगेल हे जगातील सेवाभावाचे महान उदाहरण
आहे. कोणत्याही सुविधा नसतांना त्यांनी क्राइमियन यद्धात
जखमी सौनिकांची रात्रंदिवस सेवा केली.त्या उत्तम परिचारिका
लेखक व संख्याशास्रज्ञ होत्या. १८५३ हा त्यांचा काळ.
त्याच प्रमाणे साऱ्या जगातील उपेक्षितांची माय म्हणजे मदर
टेरेसा.ही सारी इतकी महान उदाहरणे आहेत की आपल्याला आपल्या जगण्याचीच लाज वाटावी.आपल्या भारतातही अशी
महान माणसे होऊन गेली. आनंदवनचे बाबा आमटे.१९८३ साली भारत जोडो या यात्रेत या महापुरूषाला पहाण्याचा योग
आम्हाला आला तो के टी एच एम महाविद्यालयाच्या प्रांगणात.
आम्ही महाविद्यलयात शिकवत असल्यामुळे अगदी जवळून
बाबांना पाहता आले. ते बेडवर झोपूनच भारत भ्रमण करत होते. कमरेत प्रचंड वेदना असून हा महामानव भारत जोडत
होताच पण आनंदवनातील कुष्ठ रोग्यांची सेवा हे तर महाभयंकरच काम होते. हजारो उपेक्षित,समाजाने झिडकारलेल्या , रोगाने पिचलेल्या लोकांचे आनंदवन आश्रय
स्थान बनले व कुष्ठरोगी स्वाभिमानाने कष्टाची भाकरी खाऊ
लागले.आज ही प्रकाश विकास तो वारसा पुढे चालवित
आहेत.
शिक्षक उद्योजक हॅास्पिटल्स घराघरातील आई वडील ही
सारी सेवाभावाचीच उदा. नाहीत काय ? टाटा उद्योगाने स्टील
उद्योगात भारताला जगभर अग्रगण्य असे नाव मिळवून दिले.
ही भारताची त्यांनी केलेली सेवाच नाही काय ? आणि सीमेवर
लढणारे आमचे जवान ? सेवा भावाचे या पेक्षा उदात्त उदा.
काय असू शकेल ?
धन्यवाद …
आणि हो , ही फक्त आणि फक्त माझी मते आहेत ..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री : ८ : ३०