*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*पांडुरंगा*
केल्या कितीक वाऱ्या तू पाव पांडुरंगा,
स्मरताच घेत जा ना, तू धाव पांडुरंगा!
भेटीशिवाय कोठे, आहे मनात काही?
डोळेभरून पाहो, ही हाव पांडुरंगा!
चरणावरी तुझ्या त्या मी लीन होत जावो,
हृदयात आज माझ्या, हा भाव पांडुरंगा!
आषाढ तर बहाणा भेटावया तुला तो,
वारीतला नजारा, मज दाव पांडुरंगा!
भोळाच देव आहे अन् आगळीच माया,
भक्तास तोषवाया, समभाव पांडुरंगा!
जयराम धोंगडे