कुडाळ:
कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव मुठीत घेऊन सतेज सेवा बजावणाऱ्या आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना सतत 3 महिने पगारासाठी भीक मागावी लागत आहे. मुख्यमंत्री सेनेचे व परिवहन मंत्री पण सेनेचे सगळी सत्ता शिवसेनेची असताना सुद्धा कोरोणाच्या काळात एकादाही शिवसेना आमदार, खासदार, पालकमंत्री यापैकी किंवा शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी एस टी कर्मचा-यांचे हाल विचारायला एसटी डेपोत फिरकलाही नाही फक्त मतदानाच्या वेळीच लोकप्रतिनिधिंना एसटी कर्मचारी दिसतात का? शिवसेनेची सत्ता असताना एस.टी. कामगार पगारा पासून वंचित का? असे खोचक सवाल मनसे नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केले आहे. तसेच एसटी महामंडळ नुकसानात घालवायला फक्त नी फक्त शिवसेनाच जबाबदार असुन शिवशाही जबरदस्तीने एसटी महामंडळावर लादून एसटी प्रशासनाला शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनीच नुकसानात घातले असल्याचा आरोप करत तिजोरीत पैसा नसतानाही एसटी डेपोत नुतनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांपेक्षा अधिकच बोजा प्रशासनावर लादला असुन परिवहन मंत्र्यांनी केलेल्या ढासाळ नियोजनाचा परिणाम एसटी कामगारांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. कामगारांना 3 महीने पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि या सगळ्याला फक्त शिवसेना जाबबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलतांना केला आहे. तसेच एसटी प्रशासनाच उत्पन्न वाढवण्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, एम डी यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. तरिही प्रशासनाला एसटी प्रशासनाच उत्पन्न वाढवायच असेल तर महाराष्ट्र नवनिर्मान राज्य परिवहन सेनेशी चर्चा करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कोरोना काळात परिवहन मंत्री गणपतीसाठी जेव्हा जिल्हयात आपल्या गावी आले होते तेव्हा कणकवली डेपोत दौरा करून ती जागा विकसित करून कसा स्वता:चा फायदा करून घेता येईल यातच त्यांचे जास्त स्वारस्य दिसले अशी टीका करत विकसित झालेल्या जागा आणि आवारात उभारलेले पेट्रोल पंप यावर फक्त एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा प्राधान्याने हक्क असावा असे त्यांनी सांगितले.