सायबर सिक्युरिटीवर सर्वात कमी वयात लिहिले पुस्तक ; विश्वविक्रमाची नोंद
सिंधुदुर्ग :
सुकळवाड येथील मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर शाखेच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक शिवप्रकाश सिंग या विद्यार्थ्याने सर्वात कमी वयात सायबर सिक्युरिटीवर पुस्तक लिहून विश्वविक्रम केला आहे. त्याने लिहिलेले पुस्तक अमेझॉन प्लॅटफॉर्मवर भारतासह अमेरिका, फ्रान्स, इस्राएल, जपान, युकेसह २६ देशात विक्रीसाठी उपलब्ध असून अमेझॉन बेस्ट सेलर कॉम्प्युटर बुक म्हणून १७५० वा क्रमांक या पुस्तकाने मिळवला आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन मध्ये निमंत्रित करून त्याचा विशेष सत्कार केला.
एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे बीई कॉम्प्युटरच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक याने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येईल यावर आधारीत “वेब हॅकिंग १०१ : बुक फॉर व्हाईट हॅट हॅकर” हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अमेझॉनवर प्रकाशित करण्यात आले असून सर्वात कमी वयात सायबर सिक्युरिटीवर पुस्तक लिहिण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंद झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला राजभवनवर निमंत्रित करून त्याचा विशेष सत्कार केला. यावेळी अभिषेकने स्वतः लिहिलेले पुस्तक राज्यपालांना भेट दिले. यावेळी राज्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर राज्यपालांनी अभिषेकशी चर्चा करीत काही सायबर गुन्हे सोडवण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. अभिषेक याने एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे बीई कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले असून मास्टर इन सायबर सिक्युरिटी अभ्यासासाठी युके मधील केंब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये त्याने ऍडमिशन घेतले आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल एमआयटीएम संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, डीन पूनम कदम, राकेश पाल यांच्यासह संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.