*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गौळण*
*नटखट कान्हा*
गोंडस बाळ बाई हरी, करी दह्यादूधाची चोरी
चोरून खातोया माखन, रूप लोभस हे भारी !!धृ!!
गवळ्याच्या आम्ही नारी, गोपिका रुपगुणसुंदरी
नको अडवूस तू आम्हा, कान्हा रे वाटेवरी
जाता मथुरेला मटकी, दह्यादुधाची डोईवरी
चोरून खातोया माखन….. !!१!!
करू नको असा तू दंगा, नको छेडू गोऱ्या रंगा
किती सांगायचे तुला, कुणीतरी कान्हाला सांगा
नको भिजवूस मागुनी, घडा भरते यमुनातीरी
चोरून खातोया माखन….. !!२!!
ठेऊ कुठे मी लपवुनी, नदीकाठी वस्त्रे सारी
संधी साधुनी तू नेतो, पळवुनी साडी भरजरी
सांग कशी उरली नाही, लज्जा तुझ्या अंतरी
चोरून खातोया माखन, रूप लोभस हे भारी !!३!!
©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी