मालवण (मसुरे) :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून मसुरे येथील श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प. केंद्रशाळा मसुरे नं. १ या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर याना पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री ताम्हणकर यांनी देवली खालची, वेरली या शाळेत गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. विविध सहशालेय उपक्रम, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहभागी करुन आपल्या शाळेची गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच कार्यरत असतात. श्री. ताम्हणकर हे कोकण मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ, ग्रंथालय या संस्थांचे आजीव सदस्य, क्रियाशील कार्यकर्ते आणि कार्यकारिणी सदस्य आहेत.
श्री. ताम्हणकर यांना यापूर्वी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार , कोकण मराठी साहित्य परिषदेचा कलागौरव पुरस्कार , बॅ. नाथ सेवांगण मालवणचा य. बा. चोपडे गुरुवर्य पुरस्कार , दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीचा आदर्श शिक्षक पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एका अष्टपैलू शिक्षकाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने मसुरे नं. १ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, सरपंच संदीप हडकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी जि.प. अध्यक्ष सरोज परब, संग्राम प्रभूगावकर, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी गुरुनाथ ताम्हणकर यांचे अभिनंदन केले आहे.